पेरणोलीत हत्तीच्या हल्यातून शेतकरी बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 03:33 PM2020-10-28T15:33:00+5:302020-10-28T15:34:41+5:30
wildlife, elephent, kolhapurnews पेरणोली (ता. आजरा) येथे रात्री पिकांच्या रखवालीसाठी जाताना वाटेत आडव्या आलेल्या हत्तीच्या हल्यात प्रसंगावधान दाखवल्यामुळे शेतकरी बचावला. तातोबा जोशिलकर (वय ६३) असे बचावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
पेरणोली : पेरणोली (ता. आजरा) येथे रात्री पिकांच्या रखवालीसाठी जाताना वाटेत आडव्या आलेल्या हत्तीच्या हल्यात प्रसंगावधान दाखवल्यामुळे शेतकरी बचावला. तातोबा जोशिलकर (वय ६३) असे बचावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जोशिलकर हे नेहमीप्रमाणे बोरीचा सरवा नावाच्या शेताकडे भाताच्या रखवालीसाठी जात होते. मंगळवार (२७) रात्री पावणे आठच्या सुमारास शेताकडे निघाले होते. आजरा-पेरणोली रस्त्यावर सदाशिव कांबळे यांच्या शेताजवळ हत्ती अचानक आडवा आला.
यावेळी जोशिलकर घाबरून जोरात ओरडल्याने हत्ती अंगावर आला. यावेळी कुत्रे हत्तीच्या दिशेने धावून गेल्याने जोशिलकर यांनी प्रसंगावधान राखून पळ काढला. कुत्र्याने हत्तीला रोखून धरल्याने जोशिलकर बचावले.
दरम्यान याच ठिकाणी महिन्यापूर्वी पाण्याची टाकी फोडून तुकडे केले असून ऊस, भात व भुईमुगाचे मोठे नुकसान हत्तीने केले होते. या घटनेमुळे रखवालीला जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.