कोल्हापुरातील कणेरी मठाजवळ शेतकऱ्याला आढळली मानवी कवटी, अनेक तर्कवितर्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 15:53 IST2025-03-24T15:52:46+5:302025-03-24T15:53:23+5:30
चार दिवस झाले तपासाला यश नाही

संग्रहित छाया
गोकुळ शिरगाव : कणेरी मठाच्या परिसरात शेतकऱ्याला शेतात काम करत असताना मानवी कवटी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी (दि. १९) सकाळी उघडकीस आली. सागर बाळासो आडनाईक (वय ४०, रा. वरचा माळ, कणेरी) यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
हत्ती गवताच्या शेतात त्यांना अज्ञात व्यक्तीची मानवी कवटी आढळून आली. कवटी सापडल्याची बातमी गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. गोकुळ शिरगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कवटी ताब्यात घेतली. घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र, चार दिवस उलटून गेले तरी पोलिसांना तपासात अद्याप कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आडनाईक नेहमीप्रमाणे शेतात काम करत होते. त्यावेळी त्यांना गवतात मानवी कवटी आढळली. त्यांनी तातडीने याची माहिती गावातील लोकांना दिली. त्यानंतर तत्काळ गोकुळ शिरगाव पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कवटी ताब्यात घेतली आणि पंचनामा केला. कवटी अधिक तपासणीसाठी पाठवली आहे. मात्र, ही कवटी कोणाची आहे, ती या ठिकाणी कशी आली आणि यामागे काही घातपात आहे का, याबद्दल पोलिसांना अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
कवटीबाबत अनेक तर्कवितर्क
पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत. परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेतली जात आहे. मात्र, तरीही पोलिसांना तपासात अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी नागरिकांना या संदर्भात काही माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. मानवी कवटी सापडल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. या घटनेमुळे पोलिस तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.