शेतकरी गटाला ऊसतोड यंत्र
By admin | Published: January 1, 2017 12:31 AM2017-01-01T00:31:19+5:302017-01-01T00:31:19+5:30
देवेंद्र फडणवीस : कर्ज फेडण्याइतपत शेतकऱ्यांना सक्षम करणार
शिरोळ : मागील सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली, मात्र त्याचा फायदा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना न होता बँका, सेवा संस्थांच्या धनदांडग्यानाच झाला. त्यामुळे कर्जमाफीपेक्षा प्रथम शेतकऱ्यांना कर्ज फेडण्याइतपत सक्षम बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे. भाजप सरकार हे शेतकऱ्यांचे असून त्यांच्या हिताचा निर्णय घेत आहे. ऊसतोड मजुरांची संख्या घटत असल्याने ऊस तोडणीसाठी शेतकरी गटाला ऊसतोड यंत्र देण्यास आमचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शिरोळ येथे पंचायत समिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन व शेतकरी मेळावा अशा संयुक्त कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. तत्पूर्वी दत्त कारखान्याच्या हेलिपॅडवर सायंकाळी (पान २ वर)
पावणेपाचच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर वाहनांच्या ताफ्यात मुख्यमंत्री प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनासाठी आले. उद्घाटनानंतर श्री पद्माराजे विद्यालयाच्या क्रिडांगणावर शेतकरी मेळावा झाला. अध्यक्षस्थानी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, खासदार राजू शेट्टी यांनी स्वत:च्या दुध संघातून शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव देवून राज्यात आदर्श निर्माण केला आहे. मात्र, इतर दुध संघ दुधाला दर न देता फक्त राजकारण करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची कुचंबणा होते. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सिंचन योजनेतून २५ हजार कोटी रुपयाची तरतूद करुन शेतकऱ्यांना सुक्ष्मसिंचन, विहीरी, शेततळे, जलयुक्त शिवार योजना, कृषीपंप यासह विविध योजना राबविल्या जात आहेत. खासदार शेट्टी व कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्याला दलालाच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी थेट विक्री बाजारपेठ सुरु केली आहे. यातून शेतकऱ्यांच्या उत्पादन मालाला योग्य भाव मिळत आहे. जुन्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या जमिनीवर लादण्यात आलेले शिक्के भाजपा सरकारने काढून शेतकऱ्यांना जमिनी परत देण्याचा नवा इतिहास केला आहे.
यावेळी खासदार शेट्टी म्हणाले, शिरोळ तालुका हा सर्वाधिक भाजीपाल्यासाठी प्रसिध्द आहे. देशांतर्गत व देशाबाहेर भाजीपाला पाठविण्यासाठी शिरोळ तालुक्यात पायाभूत व निर्यातक्षम सुविधा मिळाल्यास तालुक्यातील भाजीपाला सातासमुद्रापार जाईल. शिवाय हा भाजीपाला पाठविण्यासाठी रेल्वेमधून सुविधा मिळावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शेतीमालाच्या दर निश्चितीसाठी देशातील गोडावून आॅनलाईन करावीत. दुध खरेदी व विक्रीमध्ये मोठी तफावत असून ही सुविधा आॅनलाईन करण्याबाबत केंद्र शासनाकडे मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा. शिवाय शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठीही प्रयत्न करावेत, अशी मागणी खा.शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.
यावेळी पणन व कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत, सांगलीचे खासदार संजयकाका पाटील, आमदार उल्हास पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके, जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमणार, जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील, जिल्हा अधीक्षक अभियंता एस.एस.साळुंखे, जिल्हा पोलिस प्रमुख प्रदिप देशपांडे, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसिलदार किरण काकडे, हातकणंगले तहसिलदार वैशाली राजमाने, उपअधीक्षक वर्षा सुर्यवंशी, गटविकास अधिकारी राहूल देसाई, रजनीताई मगदूम, पं.स.सभापती सुवर्णा अपराज, भाजपाचे तालुकाध्यक्ष धैर्यशिल देसाई, उपसरपंच पृथ्वीराज यादव, सावकर मादनाईक, भगवान काटे यांच्यासह भाजपा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तसेच महसूल, पंचायत समिती व तालुक्यातील सर्व शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरीक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कन्यागत पर्वणीला येणार
शिरोळ येथे झालेला कार्यक्रम घाईगडबडीत झाला असलातरी कन्यागत महापर्वकाळाच्या निमित्ताने होणाऱ्या पर्वणी सोहळ्याला निश्चितच पुन्हा येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कन्यागत सोहळ्यासाठी शासनाने मोठा निधी दिला आहे. पुढील टप्प्यासाठी आणखी निधी देवू, असेही ते म्हणाले .
भाजप कार्यकर्ते रिचार्ज
शिरोळ तालुक्यात भारतीय जनता पक्षाची बांधणी सुरु आहे. गावोगावी शाखांचे फलक नसलेतरी पक्ष नोंदणीबरोबरच पक्षाची ध्येयधोरणे या चौकटीच्या माध्यमातून कार्यकर्ते सक्रिय आहेत. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या दौऱ्यामुळे शिरोळ तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली आहे.
अवघ्या सतरा मिनिटाचा कार्यक्रम
शिरोळ येथे प्रशासकीय इमारतींचे उद्घाटन आणि शेतकरी मेळाव्यासाठी मुख्यमंत्र्यांचा प्रथमच दौरा झाला. गेल्या तीन दिवसापासून याचे नियोजन सुरु होते. शासकीय यंत्रणेबरोबर राजकीय नेतेमंडळी कामाला लागली होती. शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होवून त्यावर मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन मिळेल अशी आशा होती. परंतु अवघ्या सतरा मिनिटातचं मेळावा झाला.
मुख्यमंत्र्यांचा सत्कार
मुख्यमंत्री फडणवीस यांचा शेतकरी मेळाव्यात नृसिंहवाडी दत्त देवस्थानच्यावतीने श्रींची मुर्ती देवून सत्कार करण्यात आला. तर खासदार शेट्टी यांनी ऊसाच्या पेऱ्याची माळ व भाजीपाला देवून अभिनव पध्दतीने मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार केला. मेळाव्याच्या ठिकाणी या अनोख्या सत्काराची चर्चा होती.
रुपे कार्डचे वितरण
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रुपे कार्ड व स्वॅप मशीन्स् वितरणाचा कार्यक्रम मेळाव्यात झाला. यावेळी चंद्रकांत जोंग, अनंतकुमार पाटील, शंकर लंबे, दिपाली पाटील, धनंजय आडगाणे, दिपाली भोकरे यांना रुपे कार्ड तर तहसिल कार्यालय, पंचायत समिती, भूमि अभिलेख, राजलक्ष्मी गॅस एजन्सी व युथ आयकॉन यांना स्वॅप मशीन वितरीत करण्यात आली.
पक्षप्रवेशाची केवळ चर्चाच : गेल्या दोन-तीन महिन्यांपासून भारतीय जनता पक्षात शिरोळ तालुक्यातील अनेक नेतेमंडळी प्रवेश करणार अशी चर्चा होती. त्यातच मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यात तालुक्यातील कोणते नेते प्रवेश करणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात तालुक्यातील कोणाचाही प्रवेश झाला नाही. शिवाय ज्यांची यासाठी नावे चर्चेत होती ते इकडे फिरकलेही नाहीत.