दत्तवाडमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात शेतमजूर महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:23 AM2021-01-22T04:23:41+5:302021-01-22T04:23:41+5:30
याबाबत अधिक माहिती अशी, दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या अपराध यांच्या उसाच्या शेतात चार शेतमजूर महिला भांगलण करायला ...
याबाबत अधिक माहिती अशी, दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या अपराध यांच्या उसाच्या शेतात चार शेतमजूर महिला भांगलण करायला गेल्या होत्या. सकाळची भांगलाणची वेळ झाल्यानंतर सर्व घरी येत होत्या. त्यावेळी यल्लव्वा हिने शेतात गोळा केलेले जळण बांधून ठेवले होते. मी जळण घेऊन येते तुम्ही पुढे जावा, असे म्हणून तिने सोबतच्या तीन शेतमजूर महिलांना जाण्यास सांगितले. त्या महिला घरी गेल्या व यल्लव्वा मागेच राहिली. त्या दरम्यान वीस ते पंचवीस कुत्र्याच्या टोळीने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तिची मान, छाती, पोट, मांडी व पाय कुत्र्यांनी फाडून खाल्ले होते. दुपारी शेजारच्या शेतातील महिला घरी जात असताना त्यांना यल्लव्वा दिसत नाही म्हणून पाहिले असता ही घटना निदर्शनास आली.
कुत्र्यांच्या हल्ल्यात शरीराची चाळण झाली होती. उजवी बाजू संपूर्ण कुत्र्यांनी खाल्ली होती. घटनास्थळी वीस-पंचवीस फुटाच्या अंतरावर रक्ताचे डाग, फाटलेले कपडे व तुटलेला खोडवा ऊस दिसत होता. यामुळे कुत्र्यांबरोबर झटपट झाली असावी; मात्र वीस-पंचवीस कुत्र्यांपुढे तिचा टिकाव लागला नाही. दुपारच्या वेळी शेतात कोणी नसल्याने तिचा आवाज कोणी ऐकला नाही. एक बाजू संपूर्ण कुत्र्यांनी खाल्ल्याने तेथील चित्र विदारक झाले होते.
पोलीस पाटील संजय पाटील यांनी या घटनेची माहिती कुरुंदवाड पोलीस ठाण्यात दिली. घटनास्थळीच पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यल्लव्वा यांच्या मुलाचेही काही दिवसांपूर्वीच निधन झाले असून, पती-पत्नी दोघेच राहत होते. पत्नीचेही निधन झाल्याने पती बाळू वडर सुन्न होऊन झाडाखाली बसला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
फोटो - २१०१२०२१-जेएवाय-०८-मृत यल्लव्वा वडर