कोल्हापुरातील कुरुंदवाडमध्ये शेतकऱ्याचा खून, कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 11:46 AM2023-10-16T11:46:28+5:302023-10-16T11:46:49+5:30
धारधार शस्त्राने वार करण्यात आल्याने रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता
गणपती कोळी
कुरुंदवाड: शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या शेतकर्यांचा अज्ञाताने धारधार शस्त्राने हातावर व पायावर वार करुन खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुनिल भिमराव चव्हाण (वय ५५ रा. माने हाॅस्पिटलजवळ, कुरुंदवाड) असे खून झालेल्या शेतकर्यांचे नाव आहे. येथील अशोका हाॅटेलच्या मागील बाजूस अनवडी नदीच्या काठावरील गवती शेतात ही घटना घडली. त्याच्या हातावर व पायावर धारधार शस्त्राने वार करण्यात आल्याने रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता.
चारा आणण्यासाठी गेलेला त्याचा मेव्हणा तेरवाडचे उपसरपंच जालिंदर शांडगे यांनी पाहून त्यांना जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. येथील अशोका हाॅटेलच्या मागील बाजूस अनवडी नदीच्या गवती शेतात ही घटना घडली आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.
दरम्यान खूनाची घटना समजताच कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक सागर पोवार यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. रात्री उशिरा इंचलकरंजी विभागाचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवी यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली व तपासासाठी योग्य ते मार्गदर्शन केले.