कसबा बीड येथे कुऱ्हाडीच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:26 AM2021-07-27T04:26:43+5:302021-07-27T04:26:43+5:30
कोल्हापूर : पुराच्या पाण्यात वाहून आलेली लाकडे काढण्यावरुन झालेल्या मारामारीत कुऱ्हाडीच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. कृष्णात राजाराम ...
कोल्हापूर : पुराच्या पाण्यात वाहून आलेली लाकडे काढण्यावरुन झालेल्या मारामारीत कुऱ्हाडीच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. कृष्णात राजाराम लोहार (वय ५८, रा. कसबा बीड, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे. ही घटना करवीर तालुक्यातील कसबा बीडमध्ये सोमवारी घडली. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे जोती नाथा लोहार, संदीप दत्तात्रय लोहार, बाळू दत्तात्रय लोहार (सर्व रा. कसबा बीड) अशी आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कसबा बीड येथे कृष्णात लोहार हे आपल्या शेतात पुराच्या पाण्यातून वाहून आलेले लाकडी ओंडके व फळ्या काढत होते. त्यावेळी संशयितांनी त्यांना शिवीगाळ करुन दमदाटी केली. त्यावरुन त्यांच्यात वाद उफाळला. यातूनच संशयितांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. कुऱ्हाडीचा घाव त्यांच्या डोक्यात लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.