उमळवाडच्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू
By Admin | Published: December 18, 2015 12:55 AM2015-12-18T00:55:53+5:302015-12-18T01:18:57+5:30
शेतीच्या कामासाठी पेंढारवाडी येथे गेले होते
उत्तूर : पेंढारवाडी (ता. आजरा) येथे कामास असणाऱ्या महादेव किसन कांबळे (वय ५३, रा. उमळवाड, ता. शिरोळ) या शेतकऱ्याचा विहिरीत पडून बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत आजरा पोलिसांत दशरथ शिवाजी आजगेकर (वय ४७, रा. पेंढारवाडी) यांनी वर्दी दिली आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, महादेव कांबळे हे शेतीच्या कामासाठी पेंढारवाडी येथे गेले होते. बुधवारी सायंकाळी शेताकडे जातो म्हणून गेले ते परत घरी आलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, ते सापडले नाहीत.
दरम्यान, गुरुवारी सकाळी ११ वाजता आजगेकर यांच्या विहिरीवर चप्पल, विळा, दोरी दिसली. त्यामुळे ते विहिरीत पडल्याची शक्यता वर्तविण्यात आली. विहिरीत शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे विहिरीत पाय घसरून पडल्याची नोंद आजरा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
अधिक तपास पोलीस हवालदार शंकर कोळी,
कॉ. श्रीकांत देसाई, दिगंबर देसाई करीत आहेत. (वार्ताहर)