पीक विमा योजनेपासून शेतकरी वंचित राहणार?
By admin | Published: July 21, 2016 09:01 PM2016-07-21T21:01:20+5:302016-07-21T22:09:46+5:30
शिरोळ तालुक्यातील चित्र : पेरणी दाखला मिळत नसल्याने शेतकऱ्यांतून संताप
संदीप बावचे-- जयसिंगपूर --‘शासकीय काम अन् सहा महिने थांब’ याचा अनुभव शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना येत आहे. पीक पेरणी दाखला तलाठ्यांकडून मिळत नसल्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेपासून तालुक्यातील शेतकरी वंचित राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ३१ जुलै २०१६ पर्यंत पीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी पीक पेरणी दाखला मिळत नसल्याने पूरग्रस्त शेतकरी हवालदिल झाला आहे. शिवाय पुरामुळे नुकसानीचे पंचनामे केव्हा होणार? याकडे त्याचे लक्ष लागून राहिले आहे.
संततधार पाऊस आणि कृष्णेसह पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जून महिन्यात सोयाबीन, भात, भुईमूग, उडीद, मूग, मिरची, आदी पिके शेतकऱ्यांनी घेतली होती. पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यातच जुलैअखेर प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. मात्र, जिल्हा बँक असो वा नॅशनल बँक याठिकाणी शेतकऱ्यांना पीक पेरणी दाखल्याशिवाय पीक विमा योजनेत सहभागी होता येणार नाही, असे सांगण्यात आले आहे. यामुळे शिरोळ तालुक्यातील शेतकरी चांगलाच हैराण झाला आहे. पुरामुळे नुकसान झालेले पंचनामेदेखील अद्याप झाले नसल्यामुळे स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेचे विश्वास बालिघाटे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी शेतकऱ्यांनी शिरोळ तहसीलवर आपला मोर्चा वळविला.
यावेळी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार पी. जी. पाटील यांना देण्यात आले. त्यानंतर या शेतकऱ्यांनी थेट तालुका कृषी कार्यालय गाठून तेथील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी महावीर चौगुले, बाबू मालगावे, संदीप कगुडे, महावीर आडगाणे, महावीर माणगावे, अजित मालगावे, सुभाष चौगुले, मारुती पुजारी, रघुनाथ बिरोजे, आदी उपस्थित होते.
टाळे ठोक आंदोलन
पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकाचे तातडीने पंचनामे करावेत, पीक पेरणी दाखला तातडीने मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेच्या वतीने शिरढोण गावचावडीला टाळे ठोक आंदोलन करण्यात येणार आहे. वास्तविक पीक पेरणी दाखला देण्याची जबाबदारी तलाठ्यांची असते. मात्र, त्यांच्याकडून टाळाटाळ होत असल्याने आम्ही हे आंदोलन करणार असल्याची माहिती यावेळी विश्वास बालिघाटे यांनी दिली.
दहा दिवस राहिले
राष्ट्रीय कृषी विमा रद्द करुन प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे. जे शेतकरी विविध वित्त संस्थांकडून पीक कर्ज घेतात, अशा सर्व शेतकऱ्यांना योजना बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत. या योजनेत शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०१६ पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असले तरी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे आणि पीक पेरणी दाखला मिळत नसल्याने शिरोळ तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.