हातकणंगलेत २५ गावांत शेतकरी कंगाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:24 AM2021-07-27T04:24:33+5:302021-07-27T04:24:33+5:30
तालुक्यामध्ये २०१९ पेक्षाही मोठा महापूर आल्याने २५ गावातील शेतकरी, छोटे व्यावसायिक, शेतमजूर, पोट्री व्यावसायिक यांचे मोठे नुकसान झाले आहे. ...
तालुक्यामध्ये २०१९ पेक्षाही मोठा महापूर आल्याने २५ गावातील शेतकरी, छोटे व्यावसायिक, शेतमजूर, पोट्री व्यावसायिक यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी आणि धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे तालुका महापुराच्या मगरमिठीत सापडला आहे. पंचगंगा,वारणा नदीच्या महापुरामुळे २५ गावांना फटका बसला आहे. ७ गावांचा संपर्क तुटला आहे. ७ हजार ५२ हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेली आहेत.यामध्ये ऊस २१८९ हेक्टर
, भुईमूग १९०८, सोयाबीन २४४७ ,भाजीपाला १९८,भात १०१ इतर पिके १०० हेक्टर या पिकांचा समावेश आहे. पुरामुळे रुई -पट्टणकोडोली, पारगाव - निलेवाडी, खोची -दुधगाव, कुंभोज- सावळवाडी, इचलकरंजी -रेंदाळ -रांगोळी आदी प्रमुख मार्ग बंद आहेत. आजअखेर १०१५२ कुटुंबातील ४२ हजार १८६ नागरिकांनी स्थलांतर केले असून पंचगंगेच्या महापुरातील १० गावातील ७०८० कुटुंबे आणि वारणा महापुरातील ११ गावातील २०७२ कुटुंबे अशी तालुक्यातील २१ गावातील १०१५२ कुटुंबे एन.डी.आर.एफ. आणि स्थानिक मदतीने नातेवाईक आणि शासकीय निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित केली आहेत.
नवा रस्ता शेतीच्या मुळावर
पूरबाधित गावात रस्ता करत असताना रस्त्याची उंची वाढणार नाही याची दक्षता घेणे अपेक्षित असते,परंतु याचा विचार न करता मोठ्या प्रमाणात रस्त्याची उंची वाढवल्याने भादोले, किणी,घुणकी,चावरे, पारगाव, निलेवाडी येथील शेती मोठ्या प्रमाणात पाण्यात गेल्याचे समोर आले आहे.