हत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार पंधरा दिवसात भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:30 AM2021-02-27T04:30:49+5:302021-02-27T04:30:49+5:30
दरम्यान, हा हत्ती ज्या मार्गाने वस्तीत आला होता, त्याच मार्गाने त्याला गुरुवारी वन विभागाच्या ५२ वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने जंगलाकडे ...
दरम्यान, हा हत्ती ज्या मार्गाने वस्तीत आला होता, त्याच मार्गाने त्याला गुरुवारी वन विभागाच्या ५२ वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने जंगलाकडे मार्गस्थ केले. आता या हत्तीचा आजरा तालुक्यातील अरळकुंडी परिसरात मुक्काम आहे.
या नुकसानग्रस्त भागास आज, शुक्रवारी सकाळी कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, उपवन संरक्षक आर. आर. काळे यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी फिरत्या पथकाचे वनपेत्रपाल युवराज पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकरही उपस्थित होते.
पंधरा दिवसात भरपाई देण्याचे नियोजन
पंचनामे लवकरात लवकर कन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंधरा दिवसात भरपाई देण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले असून आठ दिवसांत भरपाई देण्यासाठी वन खाते प्रयत्नशील आहे. यावेळी त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधीची भेट घेऊन हत्तीप्रवण भागातील शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देणार असल्याचे सांगितले आहे.
वनविभागाचे स्वतंत्र पथक कार्यरत राहणार
नुकसानग्रस्त भागात वनविभागाचे स्वतंत्र पथक गस्तीसाठी कार्यरत राहणार असून पुन्हा हत्तीचे दर्शन झाल्यास तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन वन विभागाने केले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे हत्तीने नुकसान केले आहे, त्यांनी तत्काळ वन विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करवीरचे वनक्षेत्रपाल सुधीर सोनवले यांनी केले आहे.
कोट
जंगल परिसरातील वन्यप्राणी नागरी वस्तीत वारंवार येत असतात. अशावेळी ग्रामस्थांनी गर्दी करू नये. यावेळी हत्तीला आवरण्याऐवजी बघ्यांची गर्दीच नियंत्रित करण्यासाठी वन विभागाची शक्ती खर्च झाली. यासाठी लोकांचे प्रबोधन करण्यासाठी वन विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्याचा मानस असून ग्रामस्थांनी वन्यप्राणी आढळल्यास गर्दी करू नये, संयम बाळगावा.
- सुधीर सोनवले,
परिक्षेत्र वन अधिकारी, करवीर
कोल्हापूर वन विभाग
(संदीप आडनाईक)