महापुराने हैराण शेतकऱ्यांनी घेतला भाजीपाल्याचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:25 AM2021-08-29T04:25:38+5:302021-08-29T04:25:38+5:30
बांबवडे : महापुराने ऊस, भात, सोयाबीन, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये भात, सोयाबीन, भुईमूग ही पिके पाण्याने ...
बांबवडे : महापुराने ऊस, भात, सोयाबीन, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये भात, सोयाबीन, भुईमूग ही पिके पाण्याने वाहून गेली आहेत. ज्या ठिकाणी पाणी साचून राहिले, त्या ठिकाणची पिके कुजली आहेत. अशा शेतात वाडीचरण, सरूड येथील शेतकऱ्यांनी भाजीपाला पिके घेऊन नुकसान भरपाई शासन भरोसे न राहता स्वत:च भरून काढण्याचा प्रयोग केला आहे.
जुलै महिन्यात पावसाने हाहाकार माजवला होता. यामध्ये काही शेतातील पिके मातीसह वाहून गेली, तर काही पिके पाणी साचून राहिल्याने जागच्या जागी कुजून गेली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास महापुराने हिरावून घेतला. झालेल्या नुकसानीचा मोबदला शासन किती देणार याची शाश्वती नाही. परंतु, निसर्गापुढे हार मानेल तो शेतकरी कसला. दरवर्षी महापूर, वादळ, रोग, दुष्काळ ही संकटे येतच राहणार. यासाठी शेतकऱ्यांना स्वतः पर्याय शोधावे लागणार आहेत. म्हणून शेतकऱ्यांनी कमी कालावधीत उत्पादित होणारी भाजीपाला पिके घेण्यास सुरुवात केली. कुजलेली भाताची, सोयाबीनची धसकटे काढून टाकली. दलदलीमुळे यंत्राचा वापर करता आला नाही. मनुष्यबळाचा वापर केला गेला. वांगी, टोमॅटो, पावटा, घेवडा पिके घेतली. त्यामध्ये आंतरपिके म्हणून पोकळा, मेथी ,कोथिंबीर, तांदळी यासारखी भाजीपाल्याची लागवड केली आणि त्यांच्या प्रयत्नांना चांगले यश आले आहे.
शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी ठरणार असून, नुकसान भरपाई भरून येण्यासाठी शेतकऱ्यांना त्याची मदत होणार आहे. नदीकाठी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी पावसाळ्यामध्ये पिके घ्यावी का नको याचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे अशा ठिकाणी कमी कालावधीत येणारी पिके शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहेत.
- रामभाऊ लाड, शेतकरी, वाडीचरण.