शेतकऱ्यांचे अडकले पावणे अकराशे कोटी

By admin | Published: June 10, 2015 12:18 AM2015-06-10T00:18:32+5:302015-06-10T00:27:29+5:30

प्रश्न ‘एफआरपी’चा : कर्जफेडीसह वाटपास मुदतवाढीची मागणी

Farmers are getting stuck around 11 crores | शेतकऱ्यांचे अडकले पावणे अकराशे कोटी

शेतकऱ्यांचे अडकले पावणे अकराशे कोटी

Next

राजाराम लोंढे - कोल्हापूर -साखर कारखान्यांचा हंगाम संपून साडेतीन महिने झाले तरी शेतकऱ्यांना गाळप झालेल्या उसाचे पैसे मिळालेले नाहीत. कोल्हापूर विभागातील कारखान्यांकडे ‘एफआरपी’प्रमाणे तब्बल १०७६ कोटी ९८ लाख रुपये अडकल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ३० जूनपर्यंत कर्ज भरले नाही तर व्याज सवलत सोडाच; पण नवीन कर्जही मिळणार नाही. यासाठी कर्जफेडीबरोबर कर्जवाटपास जिल्हा बॅँकेने मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
यंदा साखर कारखानदारीवर कधी नव्हे इतके अभूतपूर्व संकट आले आहे. गेल्यावर्षीही फार काही चांगले दिवस होते, असे नाही. शेतकरी संघटनेने आंदोलन करून एफआरपीची रक्कम दोन टप्प्यांत देण्यास मान्यता दिली. त्याप्रमाणे कारखान्यांनी पैसे दिले. उपलब्ध होतील तसे पैसे दिल्याने कारखानदारांसमोर फारशा अडचणी आल्या नाहीत. यंदा परिस्थिती वेगळी झाली. शेतकरी संघटनेने आंदोलन न करता कारखानदारांनाच कोंडीत पकडले. एकरकमी ‘एफआरपी’द्या; न दिल्यास फौजदारी दाखल करण्याची मागणी सरकारकडे केली. याला कोल्हापूर वगळता इतर जिल्ह्यांनी फारशी दाद दिली नाही. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद असल्याने येथील कारखानदारांनी ‘एफआरपी’प्रमाणे सरासरी २४६० रुपये दिली; पण साखरेचे दर घसरतच राहिल्याने कारखान्यांनी कशीतरी पहिल्या दोन-अडीच महिन्यांची बिले दिली. त्यानंतरची बिले थकल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ‘एफआरपी’प्रमाणे ७१८ कोटी ३२ लाख, तर सांगलीमधील ३५८ कोटी ६५ लाख रुपये कारखान्यांकडे अडकले. सांगलीतील कारखान्यांची एफआरपी सरासरी १९९९ रुपये आहे. त्यातही त्यांनी कमी उचल दिल्याने तिथे फारशी तणाताणी नाही. कोल्हापुरातील कारखान्यांबरोबर शेतकऱ्यांच्याही गळ्याला आले आहे. कारखान्यांकडून वसुली नसल्याने विकास संस्थांची वसुली ठप्प आहे. जूनअखेर शेतकऱ्यांची कर्ज खाती पूर्ण झाली नाहीत तर व्याजसवलत मिळणार नाहीच; पण त्याबरोबर नवीन कर्जही मिळणार नाही.
आगामी हंगामाची अवस्था यापेक्षा भयंकर असणार आहे. ‘एफआरपी’ सोडाच; पण त्यापेक्षा निम्मे पैसेही देणे मुश्कील होणार आहे. आगामी हंगामाची उचल २५०० रुपये धरून विकास संस्थांनी कर्जाचे वाटप केल्याने चालू आर्थिक वर्षात संस्था आणखी तोट्यात जाणार आहेत. या संकटातून बाहेर काढण्यासाठी गेल्यावर्षीप्रमाणे आॅगस्टअखेर कर्जफेडीसह वाटपास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे.


कारखान्यानिहाय देय ‘एफआरपी’ रक्कम कोटींत
कोल्हापूर :
आजरा- २५.८६
भोगावती- ३७.६२
राजाराम- २४.०३
शाहू- २४.६६
दालमिया- १८.०७
दत्त, शिरोळ- ५४.०४
बिद्री- २९.९३
नलवडे- ११.३६
जवाहर- १०५.७७
मंडलिक- ८.०२
कुंभी- १४.९७
पंचगंगा- ७९.९७
शरद- २४.४१
वारणा- १०३.२३
डी. वाय. पाटील- २९.६४
गुरुदत्त- ३५.७४
नलवडे शुगर्स- २७.६१
हेमरस- १९.६३
महाडिक शुगर्स- ८.८३
सरसेनापती- १९.५१
सांगली :
हुतात्मा- २५.०२
राजारामबापू- ३८.१४
महांकाली- ११.४६
माणगंगा- ३०.६१
राजारामबापू, वाटेगाव- १७.८९
सोनहिरा- २२.९९
वसंतदादा- ५६.३६
विश्वास- २२.९७
यशवंत- १०.०८
क्रांती- २७.४८
मोहनराव शिंदे- २१.३५
राजारामबापू, कारंडवाडी- २१.२३
डोंगराई- २२.०४
उदगिरी- ९.४३
सद्गुरू- २१.०८

वसूल नसल्याने यंदा विकास संस्था अडचणीत आल्या आहेत. जूनअखेर वसूल झाला नाही, तर संस्थेबरोबर शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. यासाठी कर्ज परतफेडी व वाटपास जिल्हा बॅँकेने मुदतवाढ द्यावी.
- संभाजीराव चाबूक, जिल्हाध्यक्ष, गटसचिव संघटना


बिनपैशाचा करार !
प्रत्येक वर्षी जून महिन्यात साखर कारखाने तोडणी व वाहतूक ठेकेदारांकडून करार करून घेतात. आगाऊ रक्कम देऊन करार केला जातो. संपलेल्या हंगामातील तोडणी व वाहतूकदारांचे पैसे देताना दमछाक झाल्याने यंदा करार सुरू आहेत; पण ते बिनपैशाचे केले जात असल्याने तोडणी मजुरांना आगाऊ रक्कम द्यायची कोठून, असा प्रश्न वाहतूक व तोडणी ठेकेदारांसमोर आहे.

गायकवाड कारखान्याचे जादा वाटप
सोनवडे येथील उदयसिंगराव गायकवाड कारखान्याची देय एफआरपी २०९४ रुपये असताना त्यांनी प्रतिटन २४०० रुपयांप्रमाणे वाटप केल्याने त्यांचे ‘एफआरपी’पेक्षा २ कोटी ७८ लाख रुपये जादा वाटप झाले; तर ‘दौलत’ची २०११-१२ मधील १८ कोटी ११ लाख, ‘वसंतदादा’ची २०१३-१४ मधील २३ कोटी ७४ लाख रुपये एफआरपीची रक्कम देय आहे.

आठशे विकास संस्था तोट्यात
विकास सेवा संस्थांचा वसूल हा सर्वस्वी साखर कारखान्यांच्या ऊसबिलावरच अवलंबून असतो. यंदा फेबु्रवारीमध्ये तुटलेल्या उसाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने बहुतांश संस्थांचा निम्म्यापेक्षा अधिक वसूल थकला आहे. परिणामी मार्च २०१५ च्या ताळेबंदात कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे आठशे संस्था तोट्यात गेल्या आहेत.

Web Title: Farmers are getting stuck around 11 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.