शेतकरी देताहेत विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:27 AM2021-09-06T04:27:20+5:302021-09-06T04:27:20+5:30
कोल्हापूर : कोरोनाने शिक्षणाची, जगण्याची सर्व परिमाणे बदलून टाकली असताना या नव्या ‘न्यू नॉर्मल’शी जोडून घेण्यामध्ये शेतकरी मागे नाहीत. ...
कोल्हापूर : कोरोनाने शिक्षणाची, जगण्याची सर्व परिमाणे बदलून टाकली असताना या नव्या ‘न्यू नॉर्मल’शी जोडून घेण्यामध्ये शेतकरी मागे नाहीत. शिवाजी विद्यापीठाच्या रेशीमशास्त्र विषयातील पदविका अभ्यासक्रम. राज्याच्या विविध भागांतील ४६ शेतकऱ्यांनी पूर्ण केला. आता त्यांची ऑनलाइन परीक्षा शनिवारपासून सुरू झाली.
विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र अधिविभागातील सेंटर ऑफ एक्सलन्स अँड इनक्युबेशन इन सेरीकल्चर यांच्यामार्फत सन २०१७-१८ पासून रेशीमशास्त्र पदविका आणि पदव्युत्तर पदविका हे अभ्यासक्रम खास शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आले. दरवर्षी पदविका, पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी ४० जागांवर रेशीमशेती आणि त्याविषयी अभ्यास करू इच्छिणारे शेतकरी, प्रवेश घेतात. कौशल्याला शास्त्रीय ज्ञानाची जोड मिळाल्याने त्यातील अनेक यशस्वी रेशीम उद्योजक बनले आहेत. गेल्या वर्षभरात कोरोना असतानाही शेतकरी या अभ्यासक्रमात ऑनलाइन सहभागी झाले. चार विषयांसाठीची ऑनलाइन व्याख्याने, एक प्रात्यक्षिक पेपर आणि एका प्रकल्पाद्वारे त्यांनी ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांची ऑनलाइन परीक्षा शनिवारपासून सुरुवात झाली. खाद्यवनस्पती लागवड व व्यवस्थापन या विषयाची ऑनलाइन परीक्षा ४६ शेतकऱ्यांनी यशस्वीरीत्या दिली. ही परीक्षा गुरुवार (दि. ९) पर्यंत चालणार आहे. त्यासाठी प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए. ए. देशमुख, रेशीमशास्त्र अभ्यासक्रम समन्वयक डॉ. ए. डी. जाधव, परीक्षा प्रमुख डॉ. अण्णा गोफणे कार्यरत आहेत.