कोल्हापूर: ५० हजार जमा झाले नसल्याने शेतकरी हवालदिल, हेलपाटे सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 12:59 PM2022-11-03T12:59:39+5:302022-11-03T13:00:10+5:30
या अनुदानाची पहिली यादी दिवाळीपूर्वी जाहीर झाली. यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली.
हातकणंगले : नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान मिळणाऱ्या पहिल्या यादीमध्ये नाव असलेल्या तसेच लाभार्थी शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण होऊनही हजारो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नसल्याने शेतकऱ्यांचे उपनिबंधक कार्यालय, जिल्हा बँकेमध्ये हेलपाटे सुरू झाले आहेत.
शासनाने तीनपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीक कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. या अनुदानाची पहिली यादी दिवाळीपूर्वी जाहीर झाली. यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली. पहिल्या यादीमध्ये नाव आलेल्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी शासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन आधार प्रमाणीकरण करून घेतले. ज्या शेतकऱ्यांची नावे आली त्यांचीच आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, या लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसेच जमा झाले नसल्याने लाभार्थी हवालदिल होऊन सेवा संस्था सेक्रेटरी, उपनिबंधक कार्यालय ते जिल्हा बँक असे हेलपाटे मारत आहेत.
पात्र लाभार्थींची नावे सरकारी पोर्टलवर भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विकास सेवा संस्था सेक्रेटरी यांनी पूर्ण केली आहे. यादीची दुरुस्ती, यादीमधील बदल, याद्या अद्ययावत करणेचे काम सेक्रेटरी यांनीच पूर्ण केले. उपनिबंधक कार्यालयाच्या आदेशानुसार सरसकट लाभार्थी याद्या पाठविण्यात आल्याने गावपातळीवरील सर्वच क्षेत्रातील लाभार्थी यामध्ये सामील झाले आहेत.