शेतकऱ्यांनी ठोकले वन कार्यालयांना टाळे
By admin | Published: February 12, 2016 01:17 AM2016-02-12T01:17:35+5:302016-02-12T01:18:38+5:30
प्राण्यांचा बंदोबस्त करा : कार्यालयासमोर शेतकऱ्यांकडून सात-बारा उताऱ्यांची होळी, मंगळवारी प्रांत कार्यालयात बैठक
चंदगड : गेली दहा वर्षे चंदगड तालुक्यात जंगली प्राण्यांनी धुमाकूळ घातला असून, शेतकऱ्यांना ‘सळो की पळो’ करून सोडले आहे. वनविभागाने गवे, हत्ती यांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अनेकवेळा तोंडी-लेखी विनंत्या, अर्ज देऊनही वनविभागाने दुर्लक्ष केल्यामुळे गुरुवारी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वनविभागाच्या पाटणे व चंदगड येथील कार्यालयांना ‘टाळे ठोको’ आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी वनविभागाचा धिक्कार करून प्रतिगुंठा कमी नुकसानभरपाई मिळत असल्याच्या निषेधार्थ आपल्या ७/१२ उताऱ्यांचे यावेळी दहन केले.
गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अॅड. संतोष मळवीकर, विवेक पाटील, विलास पाटील, बाबूराव हळदणकर, बसवंत अडकूरकर, वसंत निट्टूरकर, विनोद पाटील, नामदेव गावडे, आप्पाजी गावडे, संतोष पाटील, रामचंद्र मोरे, रूपेश अनगुडे, आदी शेतकऱ्यांनी पाटणे येथील वनकार्यालयात येऊन वनक्षेत्रपाल एस. बी. तळवडेकर यांच्याशी मागण्यांबाबत चर्चा केली.
निवेदन देऊनही उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत कार्यालयाला टाळे ठोकणार असा पवित्रा घेतला. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयाला टाळे ठोकले. त्यानंतर पाटणे येथील वनविभागाचे सर्व कर्मचारी व आंदोलक चंदगड येथील वनकार्यालयाकडे आले. यानंतर अॅड. मळवीकर व आंदोलक चंदगड येथील वनकार्यालयाकडे आले असता अॅड. मळवीकर, विवेक पाटील, बाबूराव हळदणकर यांनी वरिष्ठांना बोलावून घ्या व आमच्या मागण्या मान्य करा; नाहीतर वरिष्ठ येईपर्यंत कार्यालयाला टाळे ठोकणार, अशी भूमिका घेतली. दरम्यान, भ्रमणध्वनीवरून सी. जी. गुजर यांनी उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांच्याशी चर्चा केली. नंतर ानक्षेत्रपाल तळवडेकर यानां हत्ती हटविण्यासाठी ठोस निर्णय घेण्यासंदर्भात वनविभागाच्या सचिव स्तरावरील अधिकारी यांना गडहिंग्लज येथील प्रांत कार्यालयात मंगळवारी (दि. १६) सायंकाळी चार वाजता उपस्थित ठेवणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आंदोलकांनी प्रांत कार्यालयात होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याचे मान्य करून टाळे ठोको आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)
हत्ती हटवण्यासाठी कमी पडलो
वन क्षेत्रपाल तळवडेकर यांनी उप वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी हत्ती हटविण्यात आपणही कमी पडत असल्याचे कबूल करत जिल्हाधिकारी यांच्याशी बैठकीत व्यस्त असल्यामुळे आपण येऊ शकत नसल्याचे सांगितले.