दूध दर फरकाअभावी शेतकºयांचे ‘दिवाळे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:35 AM2017-10-16T00:35:54+5:302017-10-16T00:35:54+5:30
शिवाजी सावंत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील पश्चिम भागातील सुमारे १२५ दूध संस्था तोट्यात असल्याने ‘गोकुळ’ने दिलेला दिवाळी बोनस उत्पादकांना वाटण्यात असमर्थ ठरल्या आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत चटणी-भाकरी खाण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे, तर संस्थाचालक आणि सचिवांवर कमी पडणारी रक्कम गोळा करण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ आली आहे.
गोकुळ संघातर्फे दूध उत्पादकांना दीपावलीसाठी म्हैस दुधाला प्रतिलिटर दोन रुपये साठ पैैसे, तर गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर एक रुपये साठ पैसे दिले आहेत. त्यांनी त्यातील बिनपरतीची ठेव म्हणून प्रतिलिटर पन्नास पैसे कपात केले. मात्र, कडगाव शीतकेंद्राकडून अनेकवेळा खराब प्रतीचे दूध दाखविले गेल्याने तोट्यात गेलेल्या भुदरगडमधील संस्थांना या कपातीमुळे उत्पादकांना दिवाळीचा बोनस वाटण्यास पैसे कमी पडले. त्यामुळे अनेक संस्थांनी आजअखेर बोनस वाटलेला नाही.
गोकुळ दूध संघाने दूध संकलन करण्यासाठी बिद्री येथे संकलन प्रकल्प उभारला आहे. या ठिकाणी भुदरगड तालुक्यातील पाटगावपासून दूध संकलित केले जात होते. पाटगावपासून बिद्री संकलन केंद्र ५० कि.मी.पेक्षा जास्त अंतरावर असल्याने संस्थेत दूध जमा केल्यापासून ते शीतकेंद्रात संकलित होण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे शुद्ध दुधाची प्रत खराब होत होती. पर्यायाने दूध संस्था आणि शेतकºयांचा तोटा होत होता. ही अडचण लक्षात घेऊन ‘गोकुळ’ने कडगाव येथे बल्क कुलर प्रकल्प उभा केला; पण या भागातील दूध संस्थांची स्थिती ‘सासूसाठी वेगळं झाली आणि सासूच वाटणीला आली’ अशी झाली आहे. दुधाची प्रत चांगली होण्याऐवजी काही अधिकाºयांकडून अधिक प्रमाणात खराब दूध दाखविले ेजात आहे. यातूनच संस्थेच्या नफ्यात घट आल्याने उर्वरित रक्कम घालून ती उत्पादकांना देणे अशक्य झाल्याची चर्चा संस्थेचे अध्यक्ष व सचिव करीत आहेत.
राजकीय नेते गावात आपला गट तयार व्हावा यासाठी सेवा संस्था आणि दूध संस्था उभा करतात. गट मोठा झाला की विभाजन होऊन आणखीन छोट्या छोट्या संस्था उभारल्या गेल्या. यामुळे दूध संकलन कमी प्रमाणात होऊ लागले. संस्थांना त्यांचा दैनंदिन व्यवहारातील खर्च भागविताना नाकीनऊ येऊ लागले होते. त्यातून कधीकधी दुधाची प्रत खराब आल्यावर आणखीन तोटा सहन करावा लागत होता. दुधाची प्रत चांगली टिकावी म्हणून कडगाव येथे छोटे शीतकेंद्र प्रकल्प उभारला गेला. या प्रकल्पाने शेतकरी व संस्थेचे भले होण्याऐवजी तोटाच सुरू आहे. या ठिकाणी अधिकवेळा खराब प्रतीचे दूध दाखवून संस्थेचा तोटा केला जात आहे, असे या भागातील काही सचिव नाव न सांगण्याच्या अटीवर सांगत आहेत.
अंतर कमी असूनही दूध खराब कसे?
कडगाव शीत केंद्रांतर्गत शेणगाव फये ते पाटगाव आडे तळीपर्यंत दूध संकलित केले जाते. बिद्री शीतकेंद्रापेक्षा अंतर कमी झाल्याने दुधाची प्रत चांगली होण्याऐवजी या केंद्रातील दूध अधिक बिघडत आहे या मागे काय गौडबंगाल आहे? अनेकवेळा बैठकीमध्ये सचिवांनी तक्रार करूनदेखील संचालक मंडळाला तक्रार निवारण करण्याचे का धैर्य होत नाही हा प्रश्न आहे.