मलकापुरात शेतकऱ्याचे आमरण उपोषण
By admin | Published: March 25, 2017 12:11 AM2017-03-25T00:11:03+5:302017-03-25T00:11:03+5:30
ऊस वाळला : रितसर अर्ज करुनही विद्युत कनेक्शन देण्यास टाळाटाळ
मलकापूर : टेकोली (ता. शाहूवाडी) येथील शेतकरी तानाजी पांडू गुनुगडे यांनी वीज वितरण कंपनीने विद्युत पंपाचे कनेक्शन न दिल्याने शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आदोलन सुरू केले आहे. विद्युत कनेक्शन जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन चालू ठेवण्याचा इशारा दिला आहे.तानाजी गुनुगडे यांनी वीज वितरण कार्यालय शाहूवाडी येथे विद्युत पंपाचे कनेक्शन मिळण्यासाठी रितसर अर्ज दाखल केला होता. संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कनेक्शन देण्यास टाळाटाळ केली आहे. सात एकर शेतात उसाचे बियाणे खरेदी करून वाळू लागले आहे. पाणी परवाना मिळूनदेखील विद्युत कनेक्शन मिळालेले नाही. याच्या निषेधार्थ बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी तानाजी गुनुगडे यांनी आदोलन सुरू केल्यापासून वीज वितरण
कंपनीच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे.विद्युत पंपाचे कनेक्शन जोपर्यंत अधिकारी देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालू ठेवणार असल्याचे गुनुगडे यांनी सांगितले. तहसीलदार चंद्रशेखर सानप यांनी वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून याबाबत चर्चा सुरू केली आहे.