कडकनाथ फसवणुक : शेतकरी एकवटले, तालुका स्तरावर अर्ज गोळा करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 03:20 PM2019-09-05T15:20:57+5:302019-09-05T15:25:44+5:30
बुधवारपर्यंत २३० अर्ज दाखल झाले असून, फसवणुकीचा आकडा सात कोटींपर्यंत गेला आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे, अभ्यासपूर्वक व भक्कम पुरावे गोळा करण्याच्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम यांनी दिली.
कोल्हापूर : कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाचे आमीष दाखवून सुमारे चार कोटींची फसवणूक करणाऱ्या महारयत अॅग्रो कंपनीविरोधात शेतकरी एकवटले आहेत. तालुका स्तरावर एकत्र अर्ज गोळा करून ते आर्थिक गुन्हे शाखेत दाखल केले जाणार आहेत.
बुधवारपर्यंत २३० अर्ज दाखल झाले असून, फसवणुकीचा आकडा सात कोटींपर्यंत गेला आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे, अभ्यासपूर्वक व भक्कम पुरावे गोळा करण्याच्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम यांनी दिली.
महारयत अॅग्रो कंपनीने सुधीर शंकर मोहिते आणि संदीप सुभाष मोहिते (दोघेही रा. इस्लामपूर, जि. सांगली) यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. कराराचे उल्लंघन करून शेतकऱ्यांना आतापर्यंत पाच कोटींपेक्षा जास्त रुपयांचा गंडा घातला आहे.
पोलिसांनी शहरातील स्टेशन रोडवरील कंपनीचे कार्यालय सील केले आहे. शेकडो शेतकºयांशी केलेली करारपत्रके ताब्यात घेतली आहेत. फसवणूकदार शेतकऱ्यांनी धास्ती घेतली असून, तक्रारी देण्यासाठी त्यांची पोलीस मुख्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे गर्दी होत आहे. बुधवारी आणखी ३0 शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले.
प्रत्येकाने अर्ज दाखल करीत असल्याने त्यांच्या जबाबामुळे पोलिसांचे काम वाढत आहे; त्यामुळे शेतकऱ्यांनीच तालुका स्तरावर एकत्र अर्ज गोळा करून ते दाखल करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील अर्ज एकत्र करून फसवणुकीचा आकडा निश्चित केला जाणार आहे. आतापर्यंत २३० अर्ज दाखल झाले असून, सुमारे पाच कोटींपर्यंत आकडा पोहोचला आहे.
कंपनीचा संचालक संशयित संदीप मोहिते व हणमंत शंकर जगदाळे (रा. अंबक-चिंचणी, ता. कडेगाव, जि. सांगली) यांना ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित मोहिते याचा ताबा घेण्यासाठी इस्लामपूर न्यायालयाकडे अर्ज केला जाणार आहे.
तो ताब्यात मिळाल्यानंतर फसवणुकीचे रॅकेट आणखी जास्त उजेडात येईल. शेतकऱ्यांकडून घेतलेली रक्कम कोठे गुंतवली आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, हे स्पष्ट होईल, असेही पोलीस उपअधीक्षक कदम यांनी सांगितले.