शेतीसाठी दिवसा वीजपुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी, मात्र नेमक्या अडचणी काय? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 12:27 PM2022-02-26T12:27:27+5:302022-02-26T12:27:54+5:30
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू
विश्वास पाटील
कोल्हापूर : मागणीच्या तुलनेत होत असलेला कमी पुरवठा हेच शेती पंपांना दिवसा वीज देण्याला मुख्य अडसर असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शेतीला दिवसा वीज पुरवठा का केला जात नाही हे ‘लोकमत’ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याचा त्रास कसा कमी होईल, असा प्रयत्न होण्याची गरज आहे.
महाराष्ट्रात सध्या ८० टक्के वीज निर्मिती हे कोळशापासून होते. उर्वरित वीस टक्के ही पाण्यापासून, सोलर व पवनचक्क्यापासून होते. कोळशाच्या दराशी विजेचा दर जोडल्यास प्रति युनिट ५ रुपये ५० पैसे दराने वीज खरेदी करावी लागेल; परंतु महावितरण शेतीसाठी ही वीज सव्वा ते दीड रुपयांनी उपलब्ध करून देते.
सध्या महावितरणची २० ते २३ हजार मेगावॅट वीज पुरवठ्याची क्षमता आहे; परंतु ही मागणी सायंकाळी ६ ते रात्री १० या काळात ४० हजार मेगावॅटपर्यंत जाते. अशा वेळी भारनियमन करणे किंवा टप्पे करून वीज पुरवठा करण्याशिवाय दुसरा मार्गच नाही, असे महावितरणचे म्हणणे आहे.
पाणी किंवा अन्य कोणत्याही गोष्टीचा साठा करता येतो तसा विजेचा करता येत नाही. कोणत्या भागात कोणत्या काळात कोणत्या ग्राहकांचे भारनियमन करावे, याचा निर्णय कळवा (जि. ठाणे) येथील लोड डिस्पॅच सेंटरमधून होतो. भारनियमनाचे वेळापत्रक ठरवताना ते पूर्ण राज्यासाठी केले जाते. त्यामुळे एका जिल्ह्याला त्यातून बाहेर काढणे शक्य नाही.
दिवसा वीज पुरवठा करायचा झाल्यास खासगी कंपन्याकडून जास्त दराने वीज खरेदी करावी लागेल व ती कृषी पंपांना पुरवठा करायचा झाल्यास त्याचा दर वाढू शकतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी महावितरणने सौर कृषी पंपाचा पर्याय पुढे आणला; परंतु तो स्वीकारण्याची शेतकऱ्यांची फारशी मानसकिता नाही.
दृष्टिक्षेपात कृषी पंप
- राज्यातील एकूण कृषी पंप : ४४ लाख ४९ हजार ४९५
- कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी पंप : १ लाख ४६ हजार
- पैसे भरून प्रलंबित असलेले जिल्ह्यातील वीज कनेक्शन्स : ४ हजार
- सरासरी दर : १.२५ ते १.५० रुपये प्रति युनिट
- वीज बिल आकारणी : दर तीन महिन्यांनी