संप चालूच ठेवण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

By admin | Published: June 4, 2017 01:32 AM2017-06-04T01:32:37+5:302017-06-04T01:32:37+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांदे, टोमॅटो फेकले; सरकारचाच्या निषेधाच्या घोषणा

Farmers' determination to continue the business | संप चालूच ठेवण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

संप चालूच ठेवण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : विश्वासात न घेता काही शेतकरी नेत्यांनी सरकारशी केलेल्या तडजोडीने शेतकऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष पाहावयास मिळत आहे. शनिवारी दुपारी अचानकपणे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात कांदा, बटाटा, टोमॅटो फेकून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने पोलीस प्रशासनाची धावाधाव झाली. शेतकऱ्यांच्या संपूर्ण मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.
शेतकऱ्यांचा सात/बारा कोरा करा, ‘स्वामिनाथन’ आयोगाच्या शिफारसी लागू करा, यांसह विविध मागण्यांसाठी १ जूनपासून शेतकरी संपावर गेले आहेत. मार्केटमध्ये फळे, भाजीपाला, कांदा-बटाट्याची आवक नाहीच; पण बाहेरून मुंबई, पुण्याकडे जाणारा शेतीमाल रोखण्यास सुरुवात केल्याने सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही शेतकरी नेत्यांशी चर्चा करून संप मागे घेतल्याचे जाहीर केले; पण त्यानंतर जिल्ह्णासह संपूर्ण राज्यात तीव्र पडसाद उमटले. रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुपारी अचानक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत घोषणाबाजी सुरू केली. ‘मुख्यमंत्री, जयाजी सूर्यवंशी, सदाभाऊ खोत’ यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत सोबत आणलेले कांदा, बटाटा, टोमॅटो, उसाची फेकाफेक सुरू केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. पोलिसांनी हस्तक्षेप करीत निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या बरोबर आंदोलनकर्त्यांना चर्चा करण्यास सागिंतले.
रोज उठून तुमच्या दारात बसण्याची आम्हाला हौस नाही. कोणाला त्रास देण्याचा आमचा उद्देशही नाही; पण अन्यायाविरोधात उठाव करण्यापलीकडे आमच्या हातात काहीच नसल्याचे सांगत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयाजी सूर्यवंशी यांच्या कानात काहीतरी सांगून संपात फूट पाडण्याचे काम केले; पण शेतकरी नमणार नाही, तर सरकारला नमविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माणिक शिंदे म्हणाले, या संपात चांद्यापासून बांद्यापर्यंतचा शेतकरी व शेतकरी नेते उतरले आहेत. त्यामुळे चर्चा करताना मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना बोलावून चांगला तोडगा काढणे अपेक्षित होते. मध्यरात्री तीन वाजता मुख्यमंत्री बैठक घेऊन संपावर तोडगा काढतात, एवढी घाई कसली होती.
यावेळी अ‍ॅड. अजित पाटील, गुणाजी शेलार, टी. आर. पाटील, आदम मुजावर, कृष्णात पाटील, मकरंद कुलकर्णी, ज्ञानदेव पाटील, गोरखनाथ चंदनशिवे, आदी मान्यवर उपस्थित होते.

सरकारने शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडण्याच्या केलेल्या उद्योगामुळे शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत. पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अशी फसवाफसवी शोभत नाही. शेतकऱ्यांची ताकद काय आहे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकदा दाखवून देणार आहे. येथून पुढे आंदोलन अधिक तीव्र करून मुंबई, पुण्यासह सर्वच शहरांची नाकाबंदी करून सरकारला कोंडीत पकडणार आहोत. ५ जूनला महाराष्ट्र बंद, तर ६ जूनला सरकारी कार्यालयांना टाळे ठोकणार आहोत.
- रघुनाथदादा पाटील (नेते, शेतकरी संघटना)

भाज्यांचे दर तिप्पट
भाज्यांची आवक कमी झाल्याने दरात कमालीची वाढ झाली आहे. शनिवारी प्रमुख भाज्यांचे दर गेल्या आठवड्यापेक्षा तिप्पट झाले आहेत. रविवारी आठवडा बाजाराच्या पार्श्वभूमीवर भाजी कोठून आणायची? असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे.
———————————————————————
कोल्हापूर बाजार समितीमधील तुलनात्मक आवक क्विंटलमध्ये -
शेती माल २७ मे ३ जून
भाजीपाला २४४४ १०२३
फळे २३३७ १४५०
कांदा-बटाटा १०६७४ ३१४

आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात विस्कटलेले कांदा, बटाटा, टोमॅटो गोळा करणारी एक वयोवृद्ध व्यक्ती. (फोटो-०३०६२०१७-कोल-शेतकरी०१) (छाया-दीपक जाधव)
दीड लाख लिटरने संकलन घटले
१ संपाच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील दूध संकलनाला फटका बसला. ‘गोकुळ’, ‘वारणा, ‘स्वाभिमानी’ दूध संघांचे संकलन दीड लाख लिटरने कमी झाले आहे.
२ अनेक गावांनी स्वत:हून दूध संकलन बंद केल्याने दुधाची आवक कमी झाली आहे. ‘गोकुळ’चे सुमारे ५० ते ६० हजार लिटर, ‘वारणा’चे २५ हजार, तर ‘स्वाभिमानी’चे ६५ हजार अशी दीड लाख लिटरहून अधिक दुधाची आवक कमी झाली आहे.
३ कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक निम्म्यावर आली आहे. कांदा-बटाट्याची आवक तर एकदम कमी झाली असून, बाजार समितीकडे पाठ फिरविली आहे.
३८ टॅँकर पोलीस बंदोबस्तात रवाना
शनिवारी ‘गोकुळ’चे ३८ दुधाचे टॅँकर पोलीस बंदोबस्तात मुंबई व पुण्याला पाठविण्यात आले. इतर संघाच्याही संकलनात घट झाल्याने बाजारात दुधाचा तुटवडा जाणवू लागला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना वरवरची आश्वासने दिली आहेत. शेतकऱ्यांनी अशा भूलथापांना बळी पडू नये. एक संघटनेबरोबर चर्चा केली म्हणजे सगळ्यांना मान्य होत नाही.
- खासदार राजू शेट्टी,
नेते, स्वाभिमानी संघटना

Web Title: Farmers' determination to continue the business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.