जिल्ह्यात शेतकरी संपाचे लोण कायम
By admin | Published: June 4, 2017 01:36 AM2017-06-04T01:36:03+5:302017-06-04T01:36:03+5:30
ठिकठिकाणी आंदोलने : ‘गोकुळ’चे दूध शीतकरण केंद्र बंद पाडले; हुपरीत शिवसेनेचा रास्ता रोको
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काही संघटनांमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा होत संप मागे घेण्याचा निर्णय झाला; पण संपाबाबतच्या निर्णयाचा शनिवारी दिवसभर संभ्रम असला तरी संपाचे लोण कायम होते. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको, दूध संकलन बंद करून संपाला पाठिंबा दिला. सकाळपासून आंदोलन स्थगित झाल्याच्या उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता.
सरवडे/ बोरवडे : बिद्री-बोरवडे येथील गोकुळ दूध संघाच्या शीतकरण केंद्रावर शेतकऱ्यांनी शनिवारी सकाळी आक्रमक आंदोलन केले. शेकडो शेतकऱ्यांनी केंद्राचे प्रवेशद्वार उघडून आत प्रवेश करीत दूध भरणारे टँकर रोखले. आंदोलकांच्या गर्दीमुळे गारगोटी-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली.
कोल्हापूरकडे दूध पुरवठा करू नये, उद्यापासून संकलन करून पाठविण्याचा प्रयत्न झाल्यास अधिकारी जबाबदार राहतील. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संप असून, मागण्या मान्य होईपर्यंत दूध उत्पादकांनी दूध व भाजीपाला पाठवू नये, असे आवाहन करण्यात आले. यावेळी केंद्र बंद ठेवावे या मागणीचे निवेदन केंद्राचे प्रभारी शाखाप्रमुख डी. डी. पाटील यांच्याकडे देण्यात आले.
शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास शेतकरी आंदोलक शीतकरण केंद्रावर मोठ्या संख्येने दाखल झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज फराकटे, रघुनाथ कुंभार, डी. एम. चौगले यांनी राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा समाचार घेतला व मागण्या मान्य कराव्यात, अशी आग्रही भूमिका त्यांनी माडली. आंदोलनात पंचायत समिती सदस्य जयदीप पोवार, नंदकुमार पाटील, तानाजी साठे, प्रवीण पाटील, बाळासो पाटील, शिवाजी फराकटे, आर. आर. पाटील, संजय पाटील, प्रकाश भिऊंगडे, रघुनाथ भारमल, धनाजी फराकटे, आदी उपस्थित होते.
उचगाव : येथील मुख्य बाजारकट्टा असलेली फळे, भाजीपाला मंडई शेतकरी संपामुळे ओस पडली आहे. नेहमी गजबजलेल्या या भाजी मंडईमध्ये उचगाव, निगडेवाडी, वसगडे, सरनोबतवाडी या भागातील शेतकरी भाजी विक्री करीत असतात. संपामुळे येथे तुरळक भाजी विक्री सुरू होती.
सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली, एकोंडी परिसरातून शेतकरी संपाला प्रतिसाद मिळाला. येथे दूध संकलन बंद राहिल्याने सहा हजार लिटर दूध गोळा झाले नाही. शेतकऱ्यांनी दूध पुरवठा व भाजीपाला विक्री बंद ठेवून संपाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला असल्याचे कॉ. शिवाजी मगदूम यांनी सांगितले.
हुपरी : शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शनिवारी हुपरी (ता. हातकणंगले) येथे रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनावेळी शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलीस व शिवसैनिक यांच्यामध्ये झटापट झाल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.
आंदोलनात उपजिल्हा प्रमुख सात्ताप्पा भवान, महिपती पाटील, अमोल देशपांडे, शहाजी संकपाळ, महेश कोरवी, नितीन काकडे, राजेंद्र पाटील, गणेश कोळी, संदीप वाइंगडे, राहुल एकांडे, उदय शिंदे, अरुण गायकवाड, भरत देसाई, अकबर फरास, विशाल पाटील, रावसाहेब तांबे, राजू पिंपळगावकर, अमजद जमादार, यांनी सहभाग घेतला.
सांगरूळ : येथे शेतकऱ्यांनी शनिवारी दूध संकलन व भाजीपाला विक्री बंद करून संपास पाठिंबा दिला. यावेळी सांगरूळमधील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, सर्वपक्षीय नेते व शेतकरी यांनी एकत्र येऊन सरकार कर्जमाफी देत नाही तोपर्यंत लढा कायम ठेवण्याचा निर्धार केला.
यावेळी ‘गोकुळ’चे संचालक बाळासो खाडे, शेतकरी संघटनेचे भिकाजी खाडे, एम. के. नाळे, ‘कुंभी’चे संचालक निवास वातकर, बाजीनाथ खाडे, कृष्णात खाडे, नानासोा कासोटे, अर्जुना खाडे, एल. जी. खाडे, उत्तम कासोटे, धोंडिराम खाडे, भगवान लोंढे, सदाशिव खाडे, अरुण खाडे, सुनील कापडे आदी उपस्थित होते.
धामोड : म्हसूर्ली परिसरातून गोकुळ दूधसंघाकडे दूध संकलन करून निघालेला टेम्पो धामोड येथे तुळशी नदीवर रोखून धरत संतप्त शेतकऱ्यांनी टेम्पोतील दुधाने भरलेले कॅन तुळशी नदीपात्रात ओतून सरकार विरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
परिसरात दूध संकलनाची बातमी कळताच सकाळी आठ वाजल्यापासून तुळशी नदीवर शेकडो शेतकरी जमा झाले होते. नऊ वाजण्याच्या सुमारास दूध वाहतूक करणारा टेम्पो धामोड येथील नदीवर पोहोचताच संतप्त शेतकऱ्यांनी टेम्पोवर हल्ला चढवत टेम्पोतील दुधाने भरलेले कॅन तुळशी नदीत ओतले.
आजरा : किणे (ता. आजरा) येथील नरसिंह सहकारी दूध संस्थेने दूध संकलन बंद ठेवून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन हे न्यायासाठी सुरू असून, सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन संस्थापक विष्णुपंत केसरकर यांनी केले आहे. मराठा महासंघाच्या आजरा शाखेनेही संपाला पाठिंबा जाहीर केला. गारगोटी : भुदरगड तालुका शेतकरी मंचच्या वतीने शेतकरी संपाला पाठिंबा देत शनिवारी तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा कॉम्रेट सम्राट मोरे व रवी देसाई यांनी दिला आहे. यावेळी रवी देसाई, माजी सरपंच राजू काझी, सुनील भराडे, अविनाश शिंदे उपस्थित होते.
‘करवीर’मधील १७ गावांत कडकडीत बंद
च्कोपार्डे : शेतकरी संपाला ग्रामीण भागातून पाठिंबा मिळत आहे. करवीरमधील १७ ते १८ गावांनी दूध संकलन बंद केल्याने एक लाख लिटर दूध संकलन ठप्प झाले आहे. शेतकरी संघटनेच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर दूध वाहतूक करणारी वाहने अडवून दूध रस्त्यावर ओतण्यास सुरुवात झाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. सांगरुळ फाट्यावर अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून संतप्त संघटना कार्यकर्त्यांना शांत केले.
च् करवीरच्या पश्चिम भागातील गावातील दूध संस्थांनी या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दूध संकलन पूर्णत: बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. कोपार्डे, कुडित्रे, आडूर, कळंबे, भामटे, बहिरेश्वर, सांगरुळ, महे, पाडळी, बालिंगा, वाकरे आदी गावांतील दूध संस्थांनी शनिवारी सकाळी संपूर्ण दूध संकलन बंद ठेवल्याने पहाटे गावातील दूध संस्थांच्या आवारातील हालचाल मंदावली होती.
च्शनिवारी गोकुळ संघाशी संपर्क साधला असता ‘करवीर’मधील १७ ते १८ गावांतील दूध संकलन बंदचा परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री व आंदोलक यांच्यामध्ये तडजोड झाली असून, संपूर्ण कर्जमाफीबद्दल आश्वासक हमी देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आल्याची उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील वातावरण निवळले आहे.
कासारी नदीस दुग्धाभिषेक
बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ बोरगावच्या युवकांनी ‘गोकुळ’कडे चाललेला टेम्पो अडवून त्यातील दुधाने ‘कासारी’ नदीला अभिषेक घातला. शेतकऱ्यांच्या संपाबाबत तोडगा निघेपर्यंत परिसरातील शेतकऱ्यांनी दूध अथवा इतर शेतीमाल विक्रीसाठी पाठवू नये, अन्यथा असा प्रयत्न झाल्यास त्यांच्या शेतमालाला कासारी नदीत जलसमाधी देऊ, असा इशाराही युवा शेतकऱ्यांनी दिला.
संदीप काटकर, सचिन काटकर, अजित काटकर, अमोल काटकर, नीलेश काटकर, चेतन काटकर, रमेश खोत, उमेश पाटील, सरदार काटकर, अवधूत काटकर, आनंदा काटकर, अजित काटकर, आदी तरुण शेतकऱ्यांनी पोर्ले पुलावर ठिय्या मारला. सकाळी त्यांनी काळजवडे परिसरातून ‘गोकुळ’कडे दुधाचे कॅन घेऊन चाललेला टेम्पो अडविला. शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत टेम्पोतील कॅन खाली उतरवून घेऊन पुलावरून माय ‘कासारी’ला दुग्धाभिषेक घातला.