शेतकरी कर्जमुक्तीसाठी रस्त्यावरची लढाई

By admin | Published: April 16, 2017 01:02 AM2017-04-16T01:02:49+5:302017-04-16T01:02:49+5:30

राजू शेट्टी यांची घोषणा : कोल्हापुरात ४ मे रोजी मोर्चा; आश्वासने न पाळल्याने पवित्रा

Farmers fight for the road on debt relief | शेतकरी कर्जमुक्तीसाठी रस्त्यावरची लढाई

शेतकरी कर्जमुक्तीसाठी रस्त्यावरची लढाई

Next

जयसिंगपूर : मागील एक वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी करीत आहे. शेतकरी कर्जमुक्तीवरून संघटना आता रस्त्यावरची लढाई करणार आहे. सात-बारा कोरा होईपर्यंत संघर्ष करणारच असून, ४ मे रोजी कोल्हापूरला मोर्चा काढून पुढील आंदोलनाची घोषणा करणार आहे. शेतकऱ्यांना नव्याने उभे करायचे तर कर्जमुक्त करणे आवश्यक आहे. नरेंद्र मोदी यांनी शेतीमालाला दीडटप हमीभाव देण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याने कर्जमुक्ती ही चळवळ आता आंदोलनाच्या माध्यमातून सुरू केली आहे. त्यामुळे कर्जमुक्तीच्या या लढाईत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले.
जयसिंगपूर येथे शनिवारी सिद्धेश्वर यात्री निवासमध्ये शेतकरी मेळावा झाला. यावेळी खासदार शेट्टी बोलत होते. यावेळी उसाचा दुसरा हप्ता व शेतकरी कर्जमुक्त रॅली नियोजन याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निवडून आलेले सदस्य व पराभूत झालेल्या उमेदवारांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी खा. शेट्टी म्हणाले, कर्जमुक्तीचे शेतकरी हक्कदार आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतीमालातून जवळपास १२ ते १३ लाख कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याला शासनच जबाबदार आहे. उद्योगपतींना दिलेली कर्जे बुडत असताना शेतजमिनी तारण ठेवून शेतकऱ्यांनी कर्जे घेतलेली आहेत. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झाल्याशिवाय शांत बसणार नाही. देशभरातील शेतकऱ्यांचे एकूण कर्ज १० लाख कोटींच्या आसपास आहे. ते माफ करायला पाहिजे. शेतकरी कर्जमुक्ती रॅली ही फक्त सुरुवात आहे.
आण्णासाहेब चौगुले यांनी स्वागत केले. यावेळी वैभव कांबळे, आदिनाथ हेमगिरे, चंदगडचे पं. स. सभापती जगन्नाथ हुलजी, आण्णासाहेब लठ्ठे, विठ्ठल मोरे, सागर शंभुशेटे, डॉ. श्रीवर्धन पाटील, पं. स. सदस्य सुरेश कांबळे, जि. प. सदस्या पद्माराणी पाटील, महिला बाल कल्याण सभापती शुभांगी शिंदे, राजेंद्र गड्यान्नावर, सावकर मादनाईक यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास डॉ. महावीर अक्कोळे, मिलिंद साखरपे, आदी उपस्थित होते. नगरसेवक शैलेश चौगुले यांनी आभार मानले.


जयसिंगपूर येथे शनिवारी झालेल्या शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना खासदार राजू शेट्टी. यावेळी व्यासपीठावर आण्णासाहेब चौगुले, सुरेश कांबळे, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Farmers fight for the road on debt relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.