गडहिंग्लज कारखान्याच्या भवितव्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:23 AM2021-04-17T04:23:35+5:302021-04-17T04:23:35+5:30
ब्रिस्क कंपनीकडून गडहिंग्लज साखर कारखाना पुन्हा संचालक मंडळाच्या ताब्यात आला आहे. त्यामुळे कारखाना स्वबळावर चालविणार की अन्य एखाद्या सहकारी ...
ब्रिस्क कंपनीकडून गडहिंग्लज साखर कारखाना पुन्हा संचालक मंडळाच्या ताब्यात आला आहे. त्यामुळे कारखाना स्वबळावर चालविणार की अन्य एखाद्या सहकारी साखर कारखान्याला चालवायला देणार? की पुन्हा एखाद्या खासगी कंपनीकडे सोपविला जाणार? याकडेच शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भातील निर्णय संचालक मंडळाच्या उद्या (शनिवारी) होणाऱ्या बैठकीत अपेक्षित आहे.
२०१३-१४ मध्ये आर्थिक अरिष्टात सापडलेला हा कारखाना मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने ब्रिस्क कंपनीला सहयोग तत्त्वावर चालवायला देण्यात आला. ४३ कोटींच्या बदल्यात कंपनीने १० वर्षांसाठी कारखाना चालवायला घेतला. त्यामुळे कारखाना कर्जमुक्त झाला. परंतु, ८ वर्षात झालेला कोट्यवधीचा तोटा आणि पोषक वातावरण नसल्याची सबब पुढे करून कराराची अजूनही दोन वर्षे शिल्लक असताना कंपनीने कारखाना सोडला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील नियोजनासाठी संचालक मंडळाची खास बैठक होत आहे.
सध्या कारखान्यावर कोणतेही कर्ज नाही, हे जरी खरे असले तरी कंपनीने काढलेली कारखान्याकडील सुमारे ३८ कोटींची येणेबाकी, सेवानिवृत्त कामगारांच्या थकीत देणीसह डॉ. शहापूरकरांच्या कारकिर्दीतील ७९ कामगारांचा थकीत पगार हेच कळीचे मुद्दे आहेत. याशिवाय येत्या गळीत हंगामाची पूर्वतयारी व त्यासाठी लागणारे भागभांडवल कसे उभे करायचे? याचेही उत्तर संचालकांना शोधावे लागणार आहे.
---
* जमेची बाजू
देशभरातील साखर कारखान्यांना मशिनरी पुरविणाऱ्या 'नॅशनल हेवी इंजिनिअरिंग'ची राज्यातील पहिली मशिनरी ज्या कारखान्यात बसली. त्या गडहिंग्लज कारखान्याचे उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे हेच सध्या 'नॅशनल हेवी'चे अध्यक्ष आहेत. त्यामुळे नॅशनल हेवीकडून तांत्रिक सहाय्याचे पाठबळ कारखान्याला मिळू शकते.
* १९९० च्या दशकात नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कारखान्याच्याबरोबरीने राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा दर दिलेले श्रीपतराव शिंदे हे विद्यमान अध्यक्ष आणि संस्थापक आप्पासाहेब नलवडे यांचे सुपुत्र संग्रामसिंह हे कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत. दोघांचेही राज्यपातळीवर चांगले संबंध असल्याने त्याचा कारखान्याला फायदा होऊ शकतो.
* 'ग्रामविकास'बरोबरच कामगार मंत्रीपदाची धुरा वाहणारे हसन मुश्रीफ यांच्याकडेच जिल्हा बँकेची सूत्रे आहेत. त्यांनी स्वत:हून कारखान्याला मदतीची तयारी दाखवली आहे. त्यांच्याच मध्यस्थीने कारखाना व कंपनी यांच्यातील येणी-देणीचा प्रश्न निकाली काढून 'केडीसीसी'कडून कारखान्याला अर्थसहाय्य उपलब्ध करणे शक्य आहे.
--- ------------------- -
* गडहिंग्लज कारखाना : १६०४२०२१-गड-०७