शेतकऱ्यांवर आणखी भारनियमनाचा ‘फोर्स’

By admin | Published: April 6, 2017 12:54 AM2017-04-06T00:54:58+5:302017-04-06T00:54:58+5:30

गरजेनुसार भारनियमन : नियमित पुरवठ्यातही वीज कपात

Farmers 'Force' | शेतकऱ्यांवर आणखी भारनियमनाचा ‘फोर्स’

शेतकऱ्यांवर आणखी भारनियमनाचा ‘फोर्स’

Next



दत्तात्रय पाटील ल्ल म्हाकवे
विजवितरणला भारनियमन करण्याची गरज वाटली की पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचीच आठवण होत असते. सध्या, शेती पंपाना १४ ते १६ तासापार्यंत भारनियमन असतानाही आता भारनियमनाची गरज पडेल त्यावेळी ‘फोर्स’ भारनियमनाच्या नावाखाली वीज मिळणाऱ्या ८ ते १० तासांपैकी आणखी ३ ते ४ तासांपर्यंत वीजवितरण कंपनीने भारनियमनाचा घाट घातला आहे. याबाबत शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
औद्योगिक क्षेत्राप्रमाणे शेतीलाही कायमस्वरूपी विजेची शेतकऱ्यांची मागणी होत आहे. कारण एखाद्यावेळी उद्योगाला अपुरा वीजपुरवठा झाला तर आर्थिक नुकसान होण्यापलीकडे काहीही होत नाही. मात्र, शेतीला वीज न मिळाल्यास आर्थिक नुकसानीबरोबर जीवनावश्यक ‘अन्नधान्य’ या घटकालाही मुकावे लागणार आहे. आणि अन्नधान्य तयार करणारा शेती शिवाय दुसरा कारखानाच या जगतात झालेला नाही. याची जाणीव असतानाही वीज वितरणसह शासनाच्या अधिकाऱ्यांकडून शेती आणि पर्यायाने शेतकऱ्यांकडे नेहमीच दुर्लक्ष होते. ही शोकांतिका असल्याच्या प्रतिक्रिया अनेक कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहेत.
सध्या, वैशाख वणव्यामुळे ६ ते ८ दिवसांनंतर पिकांना पाण्याची गरज भासत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून विजेची मागणी वाढली आहे. तर धरणातील पाणी तुटवड्यामुळे वीजनिर्मितीवरही मर्यादा आली आहे. अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना मार्ग काढताना दमछाक होत आहे.
दरम्यान, वाढत्या उन्हामुळे आणि वाढत्या मागणीमुळे ओरकरन (ड्रीप) होऊन वारंवार वीजपुरठा खंडित होत आहे. त्यामुळे कृषी पंपाच्या फ्युजपेटीत अ‍ॅटो स्टार्ट नसेल, तर वारंवार फ्युजपेटीकडे चकरा माराव्या लागत आहेत. किंवा फ्युजपेटीजवळ एखाद्या व्यक्तीला थांबून राहावे लागत आहे. याबाबततही शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.
रात्री-अपरात्रीचा वनवास थांबावा
ग्रामीण भागात सध्या वीज वितरणच्या उपकेंद्राने आपल्यातंर्गत येणाऱ्या गावांचे दोन विभाग करून आठवड्यातील तीन दिवस एका विभागाला दिवसा व दुसऱ्या विभागाला रात्री असा आलटून-पालटून वीजपुरवठा केला जात आहे; परंतु काळ्याकुट्ट अंधारात शेतीला पाणी देताना शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्यामुळे जीव धोक्यात घालूनच रात्री-अपरात्रीही शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी पाणी पाजावे लागते. त्यामुळे पहाटे ५.३० ते दुपारी १ पर्यंत एका विभागाला आणि दुपारी १ ते सायं. ७.३० वाजेपर्यंत दुसऱ्या विभागाला आलटून-पालटून वीजपुरवठा करावा किंवा शेतकऱ्यांना दररोज दिवसाचा वीजपुरवठा होईल असा पर्याय निवडावा. यामुळे वीज आणि पाण्याचीही बचत होऊन बळीराजाचाही रात्री-अपरात्रीचा वनवास थांबेल, अशी अपेक्षाही जाणकारांतून व्यक्त होत आहे.

Web Title: Farmers 'Force'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.