शेतकरी ‘सन्मान’ कसला ‘अडवणूक’च : राज्यातील लाखो पात्र शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 11:23 AM2019-11-30T11:23:34+5:302019-11-30T11:24:48+5:30
तोपर्यंत नवीन सरकारच्या पातळीवर कर्जमाफीच्या हालचाली सुरू आहेत. ही कर्जमाफी सुटसुटीत राबवून शेतकऱ्यांना खरोखरच कर्जाच्या जोखडातून मुक्त करणारी असावी.
राजाराम लोंढे
कोल्हापूर : महायुतीच्या सरकारने जून २०१७ मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी आणली; पण गेली अडीच वर्षे या कर्जमाफीचे गु-हाळ सुरू आहे. राज्यातील लाखो पात्र शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असून, गेली चार महिने याद्या अपलोड प्रणालीच बंद आहे. ही कर्जमाफी अधांतरीच असताना, पश्चिम महाराष्टतील महापुरात बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा झाली, पूर ओसरून चार महिने उलटले तरी अद्याप दमडीही मिळालेली नाही. तोपर्यंत नवीन सरकारच्या पातळीवर कर्जमाफीच्या हालचाली सुरू आहेत. ही कर्जमाफी सुटसुटीत राबवून शेतकऱ्यांना खरोखरच कर्जाच्या जोखडातून मुक्त करणारी असावी.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जून २०१७ मध्ये राज्यातील मार्च २०१६ पूर्वीचे दीड लाखापर्यंतची थकीत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ या नावाने कर्जमाफी सुरू केली; पण निकष, ‘पिवळी’, ‘लाल’ व ‘हिरवी’ याद्यांच्या घोळांमुळे गेली अडीच वर्षे कर्जमाफीचे गु-हाळ सुरू आहे. याद्यांतील घोळातून मार्ग काढण्यासाठी सरकारने तालुकास्तरीय समित्या नेमल्या. समितीने तांत्रिक त्रुटी दूर करून पात्र शेतक-यांच्या याद्या अपलोड केल्या.
सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ झाले; मात्र एक दमडीही शेतकºयांना मिळालेली नाही. राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. गेली चार महिने याद्या अपलोड करणारी प्रणालीच बंद असल्याने सगळी यंत्रणाच ठप्प झाली आहे.
जुलै-आॅगस्ट महिन्यांत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत महापुराने शेती उद्ध्वस्त केली. तत्कालीन महायुतीच्या सरकारने पूरबाधित शेतकºयांचे उभ्या पिकावर उचल केल्याने कर्जमाफीची घोषणा केली. महसूल यंत्रणेने पंचनामे केले, महापूर ओसरून चार महिने उलटले तरी ही रक्कम अद्याप सरकारी तिजोरीतच आहे. तोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्टÑ विकास आघाडी सरकारमध्ये कर्जमाफीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. पहिल्या दोन कर्जमाफींचे गुºहाळ सुरू असतानाच आता तिसरी कर्जमाफी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. तीन वर्षांत तिसरी कर्जमाफी असून, सरकारचे धोरण स्पष्ट नसल्याने अगोदरच्या कर्जमाफ्या अयशस्वी ठरल्या, किमान ही तरी कर्जमाफी शेतकºयांना खरोखरच कर्जाच्या जोखडातून मुक्त करणारी असावी.
ढीगभर निकषांमुळे लाभापेक्षा मनस्तापच अधिक
कर्जमाफीसाठी ढीगभर निकष राहिल्याने ती राबवायची कशी? असा पेच सरकारी यंत्रणेसमोर होता. त्यातूनच पात्र, अपात्र याद्यांचा घोळ शेवटपर्यंत राहिला; त्यामुळे कर्जमाफीच्या लाभापेक्षा शेतकºयांना मनस्तापच अधिक झाला.
कोल्हापुरातील ४१ हजार शेतकरी प्रतीक्षेत
कोल्हापूर जिल्ह्यातील ४१ हजार पात्र शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ८२ हजार खातेदारांना ३३६ कोटी ७९ लाखांची कर्जमाफी मिळाली आहे.
विभागातील १.४२ लाख शेतक-यांना कर्जमाफी शक्य
कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील २०१९ च्या खरीप हंगामात एक लाख ४२ हजार ५०६ शेतकरी थकबाकीदार आहेत. नवीन सरकारने सरसकट कर्जमाफी दिली, तर या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो.
शिवाजी महाराज कर्जमाफी योजना -
मार्च २०१६ पूर्वीची दीड लाखापर्यंतची सर्व कर्जमाफी
दीड लाखावरील थकीत कर्जासाठी ‘ओटीएस’ योजना. वरील रक्कम भरली तरच दीड लाखाची कर्जमाफी.
- एप्रिल २०१६ नंतर उचल केलेल्या पीक कर्जावर २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान.