पावणेदोन लाख शेतकऱ्यांना ६० कोटींची व्याज सवलत, राज्यात सर्वाधिक फायदा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 12:42 PM2022-02-14T12:42:27+5:302022-02-14T12:43:13+5:30
दरवर्षी जिल्हा बँक १५०० कोटींपर्यंत पीक कर्जाचे वाटप करते
राजाराम लोंढे
कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारच्या बिनव्याजी कर्ज योजनेचा राज्यात सर्वाधिक फायदा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होतो. जिल्हा बँकेच्या पातळीवर नियमित परतफेड करणारे ८५ टक्के शेतकरी असल्याने, या योजनेचा लाभ अधिक होतो. जिल्हा बँकेकडील १ लाख ८० हजार शेतकऱ्यांना सुमारे ६० कोटी व्याज सवलत मिळत आहे.
जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी तब्बल ३ लाख ९३ हजार हेक्टर क्षेत्र हे खरिपाचे आहे. त्यातही दरवर्षी जवळपास दोन लाख हेक्टर हे उसाचे क्षेत्र असते. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पीक कर्जाची उचल अधिक होते. जिल्हा बँकेच्या माध्यमातून उसाला एकरी ४६ हजार रुपये पीक कर्ज दिले जाते. त्याशिवाय ‘खावटी’, ‘मध्यममुदत’ कर्जांचे वाटपही अधिक केले जाते. साधारणत: दरवर्षी जिल्हा बँक १५०० कोटींपर्यंत पीक कर्जाचे वाटप करते.
केंद्र व राज्य सरकारने तीन लाखांपर्यंत पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापुढे जाऊन कोल्हापूर जिल्हा बँक पाच लाखांपर्यंत बिनव्याजी देत आहे. पीक कर्जाची उचल केल्यापासून वर्षाच्या आत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत मिळते.
त्यामुळे शेतकरी चिकाटीने परतफेड करून व्याज सवलतीचा फायदा घेतो. इतर जिल्हा बँकांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्हा बँकेच्या १५०० कोटी वाटप पीक कर्जापैकी सुमारे ११०० कोटी पीक कर्ज ही बिनव्याजी शेतकऱ्यांना मिळते. पाच लाखांपर्यंतच्या बिनव्याजी पीक कर्जाचा लाभ पुढील आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांना मिळणार असल्याने व्याज सवलतीचा आकडा आणखी वाढणार आहे.
राज्यात सर्वाधिक पीक कर्ज पुणे जिल्हा बँकेचे
राज्यात पुणे, अहमदनगर जिल्ह्यात शेतीचे क्षेत्र तुलनेत अधिक आहे. मात्र, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून पीक कर्जाचा सर्वाधिक पुरवठा होतो. जानेवारी २०२२ पर्यंत पुणे जिल्हा बँकेने २ लाख ८५ हजार ७६४ शेतकऱ्यांना २११० कोटी १९ लाख केवळ पीक कर्जाचे वाटप केले आहे.
उसाच्या पहिल्याच बिलात कर्जाची परतफेड
यंदाच्या हंगामात साखर कारखाने वेळेत सुरू झाले आणि एकरकमी एफआरपीप्रमाणे बिले शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर तीही वेळेत जमा होत असल्याने वसुली गतीने होत आहे. उसाच्या पहिल्याच बिलात संपूर्ण पीक कर्जाची परतफेड होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे व्याज सवलतीचा फायदाही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळणार आहे.
दृष्टिक्षेपात पीक कर्ज वाटप-
खरिपाचे क्षेत्र - ३ लाख ९३ हजार
उसाचे क्षेत्र - १ लाख ९८ हजार
अत्यल्पभूधारक शेतकरी - ५ लाख ४ हजार ११७ (७६ टक्के)
अल्पभूधारक शेतकरी - १ लाख ५ हजार ४९३ (१६ टक्के)
जिल्हा बँकेकडून कर्ज वाटप
खरीप - ८५० कोटी
रब्बी - ७२५ कोटी
खावटी - ३०० कोटी
मध्यममुदत - ५५० कोटी
कोल्हापूर जिल्ह्यातील वसुलीचे प्रमाण खूप चांगले आहे. त्यात यंदा उसाचे उत्पादन वाढले आणि कारखान्यांची बिलेही वेळेत जमा होत आहेत. येथील शेतकरी जागरूक असल्याने व्याज सवलतीसाठी चिकाटीने परतफेड करतात. - प्रकाश तिपन्नावार (जिल्हा प्रतिनिधी, गट सचिव संघटना)