‘क्षारपड’मुक्तीसाठी शेतकऱ्यांचा पुढाकार
By admin | Published: March 14, 2017 09:34 PM2017-03-14T21:34:38+5:302017-03-14T21:34:38+5:30
स्वखर्चातून प्रयत्न : चिंचवाडमधील सात शेतकऱ्यांचा उपक्रम
संतोष बामणे --जयसिंगपूर--शिरोळ तालुक्यात शेतजमिनी क्षारपड झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत ‘शासनाचे काम आणि सहा महिने थांब’ याचा प्रत्यय शेतकऱ्यांना आला असून, शासकीय निधीची वाट न पाहता चिंचवाड (ता. शिरोळ) येथील सात शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन सुमारे १३ एकर शेती स्वत:च्या खर्चातून क्षारपडमुक्त करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे शासनाला आतातरी जाग येणार का? असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.
सिमेंटची जंगले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरोळ तालुक्यात सुमारे ३० टक्के जमीन क्षारपडयुक्त आहे. सोन्यासारखी पिके येणारी शेती क्षारपडयुक्त बनल्यामुळे तीन-चार एकर शेताचा मालकही मोलमजुरी करून आपल्या जीवनाचा गाडा चालवित आहे. त्यातच शिरोळ तालुक्यातील शिरोळ, उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड, घालवाड, कनवाड, हसूर, शिरटी, तेरवाड, मजरेवाडी, अकिवाट, सैनिक टाकळी, राजापूर, खिद्रापूर, दानवाड, दत्तवाड यासह अनेक गावांत मोठ्या प्रमाणात क्षारपड झालेल्या जमिनी पडिक आहेत.
गेल्या काही वर्षांपासून शेतकरी लोकप्रतिनिधी यांच्याकडे क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी निधी मागणी करीत आहेत. मात्र, लोकप्रतिनिधींकडून निधी मंजूर होतो. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नाही. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे क्षारपड जमीनधारकांना आपले चारित्र्य चालविणे कठीण बनत आहे. त्यामुळे चिंचवाड येथील मनोहर गोधडे, दिलीप पाटोळे, अजित मिरजे, आण्णासाहेब शिरगावे, कुमार शिरगावे, अजित चौगुले, नाभिराज चौगुले यांनी आपल्या क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी स्वखर्चातून काम सुरू केले आहे.
यामध्ये प्रथमत: सुमारे १३ एकर जमीनक्षेत्र क्षारपड निवडली असून, यामध्ये प्रति एकरी ७० ते ८० हजार रुपये खर्च येत आहे. तर कॉन्ट्रॅक्टरद्वारे क्षारपड जमिनीत सछिद्र पाईपलाईन करण्याचे काम सुरु केले आहे. या परिसरात जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक यांच्या फंडातून चिंचवाड, उदगाव गावच्या परिसरात ड्रेनेजचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे याठिकाणी होत असलेल्या कामाला या ड्रेनेजचा फायदा होणार आहे.
शेतकऱ्यांचा प्रयत्न
शासनाने क्षारपड जमीन सुधारण्यासाठी विविध जाचक अटी घातल्या आहेत. त्यामुळे अर्धा एकर, एक एकरच्या शेतकऱ्यांना शासनाचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे चिंचवाड येथे स्वखर्चातून क्षारपड जमीन सुधारण्यासाठी चिंचवाडच्या शेतकऱ्यांनी उपक्रम हाती घेतला आहे.
स्वतंत्र निधीची गरज
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी शासनाने जमीन मालकाला स्वतंत्र निधी देणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी उर्वरीत पैसे घालून आपल्या क्षारपड जमिनी सुधारू शकेल व शासनाचा थेट निधी शेतकऱ्याला मिळेल. यादृष्टीने शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.