‘महारयत’ विरोधात गुन्हा दाखल करणार, ‘कडकनाथ’चे शेतकरी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 11:04 AM2019-08-27T11:04:51+5:302019-08-27T11:08:41+5:30
इस्लामपूर येथील महारयत अॅग्रो कंपनीच्या संचालकांनी ‘कडकनाथ’ पक्षी पालकांना गंडा घातल्याने शेतकरी सैरभैर झाले आहेत. सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांत इस्लामपूर पोलीस ठाण्यात कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे.
कोल्हापूर : इस्लामपूर येथील महारयत अॅग्रो कंपनीच्या संचालकांनी ‘कडकनाथ’ पक्षी पालकांना गंडा घातल्याने शेतकरी सैरभैर झाले आहेत. सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांत इस्लामपूर पोलीस ठाण्यात कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे.
कडकनाथ पक्षी पालक शेतकऱ्याची मोठी फसवणूक झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे दीड हजार शेतकरी यामध्ये अडकले असून, त्यांची सुमारे आठ ते १0 कोटींची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
‘लोकमत’ने सर्वप्रथम वृत्त दिल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून, सोमवारी जिल्ह्यातील शेतकरी कोल्हापुरातील महावीर गार्डनमध्ये एकत्रित आले. संबंधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. त्यानुसार शेतकरी करवीर पोलीस ठाण्यात गेले; पण कंपनी इस्लामपूरची असल्याने येथे गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे पोलीस यंत्रणेने सांगितले.
येत्या दोन दिवसांत सर्व शेतकऱ्यांच्या वतीने इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून, तहसीलदार व सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
दरम्यान, ‘महारयत’चे संस्थापक अध्यक्ष सुधीर मोहिते यांनी शेतकऱ्यांनी घाबरू नये, असे सोशल मीडियावरून आवाहन केले होते. शेतकऱ्यांकडील अंडी व पक्षी सांगली व बेळगाव येथील कंपनी खरेदी करेल. असेही त्यांनी सांगितले होते; पण संबंधित कंपन्यांनी अगोदर एक लाख रुपये डिपॉझिट भरा, मगच माल खरेदी केले जाईल.
आठ ते १0 रुपयांनी अंडी खरेदी करण्याची तयारी त्या कंपन्यांनी दाखविल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या शेतकऱ्यांनी ‘स्वाभिमानी’चे अध्यक्ष राजू शेट्टी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; पण ते भोगावती येथे कार्यक्रमानिमित्त असल्याने भेट होऊ शकली नाही.
फायदा नको, मुद्दल तेवढी द्या
अनेक शेतकऱ्यांनी घरातील दागिने विकून प्लॅन्ट उभे केले आहेत. लाखो रुपयांची फसवणूक झाल्याने ते हवालदिल झाले असून, आम्हाला फायदा नको; पण मुद्दल तेवढी द्या, अशी मागणी ते करू लागले आहेत.
गळ्यातील दागिने विकून अडीच लाखांचा पक्षी प्लॅन्ट उभा केला. कंपनी आता पक्षीही घेऊन जाईना, त्यात कोंबड्यांना औषधोपचार नसल्याने त्यांना मर लागल्याने दुहेरी संकट आमच्यासमोर आहे.
- पद्मावती जयवंत भोसले,
कसबा बावडा