महावितरणच्या झटक्याने कोगे विभागातील शेतकरी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 10:59 AM2021-03-07T10:59:30+5:302021-03-07T11:01:46+5:30
mahavitaran Kolhapur- महावितरणच्या कोगे (ता. करवीर) उपविभागीय कार्यालयाच्या झटक्याने परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. एकतर आठवड्यातून चार दिवसच शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जातो. त्यातही तासभर अगोदर वीज गायब होत आहे. अगोदरच उन्हाचा कडाका वाढत असल्याने पिके करपू लागली असताना महावितरणच्या करामतीने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
कोल्हापूर : महावितरणच्या कोगे (ता. करवीर) उपविभागीय कार्यालयाच्या झटक्याने परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. एकतर आठवड्यातून चार दिवसच शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जातो. त्यातही तासभर अगोदर वीज गायब होत आहे. अगोदरच उन्हाचा कडाका वाढत असल्याने पिके करपू लागली असताना महावितरणच्या करामतीने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा करावा, ही गेली अनेक वर्षे मागणी सुरू आहे. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देणे जोखमीचे ठरत आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. तरीही महावितरण तीन दिवस रात्रीचा वीजपुरवठा करते.
दिवसा वीजपुरवठा करताना त्यातही कमी दाबाने पुरवठा करणे, मध्यंतरी वीज गायब होण्याच्या तक्रारी आहेत. कोगे महावितरण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात शनिवारी सकाळी ८.२५ ते दुपारी ४.२५ पर्यंत शेती पंपांना वीजपुरवठा केला जातो. मुळात आठ तास वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे यामधील पाच-दहा मिनिटे वेळही शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. मात्र, शनिवारी (दि. ६) निर्धारित वेळेच्या अगोदरच वीज बंद केली गेली. असे वारंवार घडत असल्याने शेतकऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. काही तांत्रिक कारणामुळे तासभर अगोदर वीज बंद होत असेल तर दुसऱ्या दिवशी तेवढा कालावधी वाढवून देणे महावितरणास बंधनकारक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही.
महावितरणच्या कोगे कार्यालयांतर्गत येणाऱ्या शेती पंपांबाबत असा प्रकार सातत्याने होत आहे. याची चौकशी होऊन शेतकऱ्यांना विनाखंडित वीजपुरवठा करावा.
- संजय जोतिराम पाटील ,
शेतकरी, वाकरे