पावसाअभावी शेतकऱ्यांचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:17 AM2021-07-02T04:17:01+5:302021-07-02T04:17:01+5:30
जून-महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यात तालुक्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी रताळी, भुईमूग, भात व नाचणी तरवे यांची पेरणी ...
जून-महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यात तालुक्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी रताळी, भुईमूग, भात व नाचणी तरवे यांची पेरणी केली होती. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने चिंता वाढली आहे.
माळरानावरील रताळी, भुईमूग, भात ही पिके अडचणीत आली आहेत. आणखी काही दिवस पावसाने उसंत घेतल्यास दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे. तुडये-हाजगोळी भागात रताळी लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. मात्र, पावसाभावी रताळी पिकाचे वेल सुकत आहेत.
नाचणी पीक लागवडीला अजून उशीर असला तरी कर्यात भाग, उमगाव, पाटणे या परिसरात भात पिकाचे तरवे रोप लागवडीसाठी तयार आहेत. मात्र, पाण्याची सोय नसल्याने शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्याची भात रोप लागवड सुरू केली आहे.
मजुरांचा तुटवडा
तालुक्यात मोठ्या प्रमाणात काजू उद्योग स्थिरावला आहे. त्यामध्ये वर्षभर काम मिळत असून महिला मजुरांचा भरणा अधिक आहे. त्यामुळे शेती कामासाठी मजूर मिळणे अवघड झाले आहे. तालुक्याची भौगोलिक रचना पाहता पूर्वी पावसाचे प्रमाण खूप होते. मात्र, अलिकडील काळात अनियमित पाऊस पडत असल्याने तालुक्यातील शेती व्यवसायच अडचणीत आला आहे. त्यात शेतीमधून मिळणारे उत्पन्न व खर्च याचा ताळमेळ घालणे शेतकरी वर्गाला कठीण जात असल्याने त्यांनी पोल्ट्री, ग्रीन हाऊस याकडे आपले लक्ष वळविले आहे.
फोटो ओळी : तुडये (ता. चंदगड) येथे पावसाभावी रताळी पीक सुकून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
क्रमांक : ०१०७२०२१-गड-०३