Kolhapur: अचानक लादलेल्या उपसा बंदी विरोधात शेतकऱ्यांचा यल्गार, सोनगे वीज कार्यालयावर मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 11:48 AM2023-05-06T11:48:45+5:302023-05-06T11:49:10+5:30
शिवारातून थेट मोर्चात...
दत्ता पाटील
म्हाकवे : पाटबंधारे विभागाने कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक लादलेल्या तब्बल पाच दिवसाच्या उपसा बंदी विरोधात वेदंगगा काठावरील कुरुकली, सुरुपली, सोनगे, बानगे बस्तवडे परिसरातील शेतकऱ्यांनी सोनगे वीज वितरण कार्यालयावर सकाळी सकाळीच मोर्चा काढून संताप व्यक्त केला. यावेळी पाटबंधारे विभागासह वीज वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांना घेरावा घालत धारेवर धरले. तसेच, यावेळी मागे घ्या...मागे घ्या..उपसाबंदी आदेश मागे घ्या असा गजर शेतकऱ्यांनी केला.
अनेक शेतकऱ्यांच्या ऊसभरणीची कामे सुरू आहेत.तसेच शेतकऱ्यांनी ऊसाला रासायनिक खते टाकली आहेत. त्यामुळे सध्या या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे.माञ, आज शनिवारी सकाळपासून तब्बल पाच दिवसांसाठी उपासाबंदी लागू केल्याने येथील शेतकरी कासावीस झाला आहे.
वेदगंगा नदीवर आदमापुर बंधार्यापासून पुर्व भागातील मुरगुड, सुरुपली, यमगे, शिंदेवाडी, कुरुकली, मळगे, भडगाव, कुरणी, बानगे सोनगे, म्हाकवे, आनुर बस्तवडे चिखली, कौलगे यासह अनेक गावातील शेतकऱ्यांच्या पिकांना ऐन उन्हाळ्यात झळा बसणार आहे.
दरम्यान, काळम्मावाडी धरणाच्या कराराप्रमाणे कर्नाटकाला देण्यात येणारे पाणी हे नदीतूनच द्यायचे आहे. त्यामुळे सुरुवातीच्या गावात मोठ्या प्रमाणावर असणार्या उपसा यंञामुळे कर्नाटकातील शेतकऱ्यांना पाणीच मिळत नाही. त्यामुळे उपसाबंदीचा निर्णय घ्यावा लागत असून शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केले जात आहे.
यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी महेश चव्हाण, राणमाळे, सुनिल पाटील, वीज वितरणचे मेटकर,बाळासाहेब चौगुले, माजी सरपंच बी.आर पाटील, जयवंतराव पाटील, आर.व्ही.पाटील, जयसिंग पाटील-सोनगेकर, पांडुरंग डावरे, बापूसाहेब ढोले, प्रल्हाद पाटील, विलास पाटील, भास्कर पाटील,संजय पाटील यासह शेतकरी उपस्थित होते.
शिवारातून थेट मोर्चात...
काही शेतकऱ्यांना उपसा बंदीबाबत माहिती नव्हती त्यामुळे ते नेहमीप्रमाणे सकाळी मोटरपंप सुरू करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना उपसाबंदी बाबत समजताच ते शेतकरी थेट या मोर्चात सहभागी झाले.
गत आठवड्यात दोन दिवस उपसाबंदी केली होती.तरीही पुन्हा पुर्वकल्पना न देता पाच दिवस उपसाबंदी करण्याचा निर्णय चुकीचा असून तो तात्काळ मागे घ्यावा अन्यथा आम्हाला रास्ता रोको आंदोलन करावे लागेल. - जयवंतराव पाटील, कुरुकलीकर प्रशासक, शेतकरी संघ