फसव्या कर्जमाफीविरोधात निषेधार्थ भाजप रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 05:02 PM2020-02-25T17:02:52+5:302020-02-25T17:06:35+5:30
कोल्हापूर : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहीजे...फसवी कर्जमाफी करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो...अशा घोषणा देत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ...
कोल्हापूर : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहीजे...फसवी कर्जमाफी करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो...अशा घोषणा देत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी विनाअट कर्जमाफी देण्याचे आश्वासन देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने नंतर सतरा प्रकारच्या अटी लावून शेतकऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी मंगळवारी येथे केला.
सकाळी अकराच्या सुमारास भाजप कार्यकर्त्यांनी कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन सुरु केले. सातबारा कोरा झालाच पाहीजे...फसवी कर्जमाफी करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो...अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, धनंजय महाडिक, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, माजी आमदार अमल महाडिक, सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव आदींनी भाषणातून फसव्या कर्जमाफीबद्दल सरकारवर टिका केली.
दरम्यान राहुल चिकोडे यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन दिले. आंदोलनात महापालिका विरोधी पक्षनेते विजय सुर्यवंशी, नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, दिलीप मैत्राणी, माणिक पाटील-चुयेकर, डॉ. सदानंद राजवर्धन, सुभाष रामुगडे, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, नचिकेत भुर्के, संतोष माळी, नजीर देसाई, गणेश देसाई, प्रशांत बरगे, संजय सावंत, अशोक लोहार, विजय आगरवाल, अमोल पालोजी,भारती जोशी, किशोरी स्वामी,सुलभा मुजुमदार,प्रमोदनी हार्डिकर, असावरी जुगदार , गायञी राऊत उपस्थित होते.