परभणीच्या शेतकऱ्यांचा कृषी मंत्र्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:47 PM2019-02-16T12:47:10+5:302019-02-16T12:53:08+5:30
कोल्हापूर : परभणी तालुक्यातील पीक विम्याच्या भरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताराराणी चौकातील कार्यालयावर मोर्चा ...
कोल्हापूर : परभणी तालुक्यातील पीक विम्याच्या भरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताराराणी चौकातील कार्यालयावर मोर्चा काढत दिवसभर ठिय्या आंदोलन केले. परभणीमधील ६१ हजार शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. सरकारने आश्वासनापलिकडे काहीच न केल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनसह इतर खरीप पिकांचा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे विमा उतरवला होता; पण त्यांना भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांनी शुक्रवारीकृषिमंत्री पाटील यांच्या कार्यालयावर धडक दिली. गुरुवारी रात्री आठ वाजता शेतकरी परभणीवरून निघाले आहेत, शुक्रवारी दुपारी एक वाजता ते रेल्वेने कोल्हापुरात दाखल झाले.
रेल्वे स्टेशन ते ताराराणी चौकातील मंत्री पाटील यांचे कार्यालयापर्यंत मोर्चाने आले. किसान सभेचे राज्य सहसचिव विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर ठिय्या मारला. ‘कृषी मंत्री होश मे आवो...’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. किसान सभेचे डॉ. उदय नारकर, प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
अनियमित पावसामुळे संपूर्ण पीक वाया गेले. काहींनी तर रोटावेटर घालून सोयाबीन काढून टाकले. कृषी विभाग, जिल्हा परिषदेचा कृषी विभागाचे अधिकारी व विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मळणी-कापणीचे २४ प्रयोग घेतले. त्यापैकी २० प्रयोगांमध्ये शेतकरीच सहभागी नव्हते. जे चार प्रयोग केले, त्यांचे हेक्टरी दीडपासून चार क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले; पण विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी मखलाशी करत या प्रयोग अहवालात खाडाखोड करून सरासरी १४ क्विंटल उत्पादन दाखविले; त्यामुळे हे शेतकरी विमा भरपाईपासून वंचित राहिले आहेत.
परभरणी तालुक्याच्या शेजारी असणाऱ्या गंगाखेड तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला. मग येथील शेतकऱ्यांनाच उत्पादन जास्त मिळाले? असा प्रश्न विलास बाबर यांनी केला.
दरम्यान, शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर उपोषण सुरू केल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत येथे उपोषण करता येणार नाही, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात जाण्यास सांगितले.
शेतकऱ्यांनी न ऐकल्याने पोलिसांनी ताब्यात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात सोडले. शेतकऱ्यांनी तिथे उपोषण व निदर्शने सुरू केली. यावेळी उत्तम माने, गोपाळ कुलकर्णी, आदीनाथ गव्हाणे, सुभाष दिनकर, ज्ञानोबा गव्हाणे, राजेभाऊ सूर्यवंशी, मंचकराव यादव, रामा गव्हाणे, आदी उपस्थित होते.
चार महिन्यांत दुसऱ्यांदा ठिय्या
सोयाबीन विमा भरपाईची मागणी गेले वर्षभर सुरू आहे; यासाठी ३ आॅक्टोबर २०१९ ला शेतकऱ्यांनी कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर धडक दिली होती. त्यानंतर १० आॅक्टोबरला बैठक झाली, यावेळी आश्वासन दिले; पण प्रत्यक्षात चार महिन्यांत दमडीही शेतकऱ्यांच्या पदरात न पडल्याने दुसऱ्यांदा ठिय्या आंदोलन करावे लागले.
रणरणत्या उन्हात महिलांचा सहभाग
रणरणत्या उन्हात शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. उन्हामुळे रस्त्यावर पाय ठेवणे मुश्कील झाले असताना, तिथेच बसून ते सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत होते. यामध्ये महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
सदाभाऊंची गुपित माहिती
या शेतकऱ्यांना भरपाई देण्यास विमा कंपनीने नकार दिल्याने, सरकारने भरपाई देण्याची तयारी केली असून, त्यासाठी ५८ कोटींची तरतूद असल्याची गुपित माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिल्याचे बाबर यांनी सांगितले.
- विमा भरपाईपासून वंंचित शेतकरी-६१ हजार
- विमा संरक्षित क्षेत्र-५५ हजार हेक्टर
- मुख्य पीक-सोयाबीन
- निकष-हेक्टरी नऊ क्ंिवटल
सरकारने सांगितले म्हणूनच विमा हप्ता भरला, मग आता ‘रिलायन्स’ बोगस कंपनी निघाल्याचे सांगतात. आम्हाला सरकारने भरपाई द्यावी, अन्यथा उद्याच्या निवडणुकीत फिरू देणार नाही.
- विश्वनाथ राऊत,
शेतकरी, बोरवण
कर्ज काढून पीक विम्याचा हप्ता भरला; पण विमा कंपनीने फसविले. सरकारही हात वर करू लागल्याने आम्ही जायचे कोठे? ५00 किलोमीटरहून कृषिमंत्र्यांच्या दारात आलो, आता माघारी फिरणार नाही.
- आबासाहेब पोवार,
शेतकरी, सुरपिंपरी