पाणंद रस्त्यांअभावी शेतकऱ्यांची फरफट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:19 AM2021-01-09T04:19:32+5:302021-01-09T04:19:32+5:30
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील सर्वच गावांत सद्या ऊसतोडणी सुरू असून, रस्त्यालगत शेती नसलेल्या शेतकऱ्यांना डोकीवरून उसाच्या मोळ्या वाहून न्याव्या ...
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील सर्वच गावांत सद्या ऊसतोडणी सुरू असून, रस्त्यालगत शेती नसलेल्या शेतकऱ्यांना डोकीवरून उसाच्या मोळ्या वाहून न्याव्या लागत आहेत. ऊस कारखान्यात जाईपर्यंत शेतकरी मेटाकुटीला येतो. ऊसतोड मजुरांची एंट्री आणि रस्त्याची अडचण यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाणंद रस्ते नसल्याने साधारणत: अर्धा किलोमीटरवरून शेतकऱ्यांना उसाची मोळी घेऊन, पायपीट करावी लागत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचा शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे . शासनाने पाणंद रस्ते करण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी आर्त विनवणी शेतकरी वर्गातून होत आहे.
रस्ता नसल्याने रस्त्यापर्यंत ऊस शेतकऱ्यांनीच वाहायचा अशी अवस्था शिवाराच्या मध्यभागी असणाऱ्या ऊस शेतकऱ्यांची झाली आहे. नगदी पीक म्हणून ऊस पिकाकडे पाहिले जाते. काही शेतकऱ्यांनी बांधावर कांडे लावून पायवाटसुद्धा ठेवलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. यामुळे पाणंदी कशी तयार होणार या संकटात शिवारात मध्यभागी असे शेती पिकविणारा शेतकरी अडकला आहे .
सर्वच साखर कारखाने ऊसतोडणीसाठी ट्रॅक्टर व मशिनरीचा वापर करीत आहे. त्यामुळे ट्रॅक्टरसारखी वाहने पहिल्यांदा रस्त्याकडेचा ऊस तोडण्यास प्राधान्य देत आहेत. ऊस क्षेत्र गुंठेवारीत असल्याने एखाद्या शेतकऱ्याच्या फडातून गाडीवाट करायची म्हटले, तर सर्व शिवार याच वाटेने येणार म्हणून तो आपला ऊस मनुष्यबळ लावून रस्त्यावर भरण्यात धन्यता मानत आहे.
शिवारात रस्ते करायचे म्हटले तर भाऊबंदकी, एकमेकांना अडविण्याची विकृती आडकाठी येत आहे. त्यामुळे मध्यभागी असणाऱ्या शेतकऱ्याला ऊस वाहण्यास आर्थिक नुकसानीबरोबर मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. त्यामुळे ऊस फडातून अर्धा किलोमीटरपर्यंत शेतकऱ्यांना वाहून घ्यावा लागत आहे .
चौकट - ऊस वाहतुकीसाठी रस्ता नसल्याने दरवर्षी दहा टन ऊस फडातून बाहेर काढण्यासाठी २५ मजूर लागतात. यावर्षी प्रति मजूर २०० रुपये हजेरी झाल्याने दहा टनांसाठी पाच हजार रुपयांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे शासनाने पाणंद रस्त्यासाठी ठोस निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीतून बाहेर काढावे.
-
फोटो लाईन = कोनवडे येथे अर्धा किलोमीटरवरून ऊस वाहतूक करताना शेतकरी.