Kolhapur News: विकासवाडीतील औद्योगिक वसाहतीस शेतकऱ्यांचा विरोध, ..अन्यथा जन आंदोलन उभारण्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 01:05 PM2023-01-31T13:05:49+5:302023-01-31T13:06:18+5:30
..त्यामुळे औद्योगिकीकरणास आमचा विरोध
कणेरी : विकासवाडी येथे नियोजित औद्योगिक वसाहतीसाठी जमिनी देण्यास येथील शेतकऱ्यांचा विरोध आहे. जर सक्तीने भूसंपादन केले तर जन आंदोलन उभारू असा इशारा नेर्ली विकासवाडीचे माजी सरपंच व गोकुळचे संचालक प्रकाश पाटील यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
पत्रकात म्हटले आहे की, विकासवाडी येथे औद्योगिक वसाहत उभी करण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नुकतीच केली. या वसाहतीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र, या वसाहतीसाठी जमिनी देण्यास आमचा विरोध आहे. नेर्ली विकासवाडी येथील बहुतांश जमिनी सुपीक व ओलिताखालील आहेत. येथे अल्पभूधारक शेतकरी जास्त आहेत. त्यामुळे बागायत जमिनी देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.
नेर्ली येथे गोकुळ शिरगांव औद्योगिक वसाहतीचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतजमिनी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. २०१४ साली तत्कालीन गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे नवीन औद्योगिक वसाहतीची पुढील प्रक्रिया थांबवली होती. त्यामुळे आता सक्तीने भूसंपादन केल्यास जन अंदोलन उभे केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
जनावरांसाठी चारा कुठून आणणार?
नेर्ली विकासवाडी येथे दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पडसर जमिनीचा वापर चराऊ कुरणे म्हणून होत आहे. नवीन औद्योगिक वसाहत तयार झाली तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. त्यामुळे येथील औद्योगिकीकरणास आमचा विरोध असल्याचे पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.