बावड्यात वादळी वाऱ्याने कोसळलेला सव्वाशे वर्षांपूर्वीचा वृक्ष शेतकऱ्यांनी दिला पेटवून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 12:26 PM2020-06-11T12:26:37+5:302020-06-11T12:29:35+5:30
कसबा बावडा -एमआयडीसी पुला शेजारील 'गोसावी मळी' येथील सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वीचा वादळी वाऱ्यामुळे कोसळलेल्या वृक्ष वारंवार सांगूनही महापालिकेने तोडून न नेल्याने शेवटी शेतकऱ्यांनी हा वृक्ष आज पेटवून दिला .
रमेश पाटील
कसबा बावडा : कसबा बावडा -एमआयडीसी पुला शेजारील 'गोसावी मळी' येथील सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वीचा वादळी वाऱ्यामुळे कोसळलेल्या वृक्ष वारंवार सांगूनही महापालिकेने तोडून न नेल्याने शेवटी शेतकऱ्यांनी हा वृक्ष आज पेटवून दिला .
कसबा बावडा व परिसरात दोन महिण्यापूर्वी झालेल्या वादळी पावसात सुमारे सव्वाशे वर्षापूर्वीचा बावडा -एमआयडीसी पुला शेजारील गोसावी मळीतील भलामोठा वडाचा वृक्ष कोसळला होता. हा वृक्ष तोडून महापालिकेने त्याची लाकडे स्मशानभूमीतील जळणासाठी वापरावीत म्हणून शेतकऱ्यांनी स्थानिक नगरसेवक व महापालिकेला कळवले होते.
तसेच नगरसेवकांनीही याबाबत महापालिकेला कळवले होते. परंतु महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पुढे पूर आल्यावर हा भला मोठा वृक्ष पुलाच्या कमानीला अडकून पुलाला धोका निर्माण करेल या शक्यतेने शेतकऱ्यानी नाईलाजाने हा कोसळलेला वृक्ष शेवटी आज पेटवून दिला.
दोन महिन्यापूर्वी जोरदार झालेल्या वादळी वारे व पावसात बावडा- एमआयडीसी रोड वरील अनेक विद्युत खांब व झाडे उन्मळून पडली होती. काही दिवसांनी विद्युत विभागाने कोसळलेले पूल पुन्हा उभे केले. महापालिकेने या रोडवर व नागरी वस्तीत पडलेली झाडेही हटवली. मात्र सव्वाशे वर्षांपूर्वी चा भला मोठा डेरेदार वृक्ष खाजगी जागेत असल्याच्या कारणामुळे महापालिकेने लक्ष दिले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे.
हा वृक्ष हटवावा म्हणून गोसावी मळीतील २४ भागीदार शेतकऱ्यांनी स्थानिक नगरसेवकांना हा वृक्ष तोडून घेण्याबाबत सांगीतले. परंतु महापालिकेकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
दोन आठवडे लाकडे पुरली असती...
हा वृक्ष महापालिकेने जर तोडून नेला असता तर किमान दोन आठवडाभर त्यांना कोल्हापुरातील स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यासाठी लाकडे पुरली असती. पण महापालिकेने याकडे लक्ष दिले नाही.
- बाबासो दळवी
शेतकरी,कसबा बावडा
अद्याप वेळ गेलेली नाही....
सध्या पेटवून दिलेला वृक्ष पूर्णपणे जळून जाण्यास काही दिवसाचा अवधी जाणार आहे. महापालिका अजूनही हा वृक्ष तोडून त्याची लाकडे स्मशानभूमीसाठी वापरू शकते.