शेतकऱ्यांनी ई-पीक प्रक्रिया लवकर करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:25 AM2021-09-03T04:25:42+5:302021-09-03T04:25:42+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील ई-पीक प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. पुढील काही दिवसात हे ॲप बंद होण्याची शक्यता आहे तरी शेतकऱ्यांनी ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील ई-पीक प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. पुढील काही दिवसात हे ॲप बंद होण्याची शक्यता आहे तरी शेतकऱ्यांनी ॲपद्वारे आपल्या सात बारावर पीकपाण्याची नोंद करावी अन्यथा त्यांना पीक कर्ज, विमा यासह शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना ईपीक प्रक्रिया वेगाने करण्याबाबतच्या सूचना दिल्या.
शेतकऱ्यांच्या सात बारावर दरवर्षी ऑगस्टच्या दरम्यान पिकांची नोंदणी केली जाते. त्या त्या गावच्या तलाठ्यांमार्फत ही प्रक्रिया केली जात होती. मात्र आता ती ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. त्याबाबतचा आढावा गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापुरात ई-पीक नोंदणी संथगतीने होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी अधिकाऱ्यांनी शिवाय अनेक गावांमध्ये इंटरनेट कनेक्शन, रेंज, सर्व्हर डाऊन होणे अशा अनेक अडचणी येत असल्याचे सांगितले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी ॲप अपडेट करण्याबाबतच्या सूचना दिल्या.
शेतकऱ्यांना या ॲपद्वारे कशी नोंदणी करायची हे माहीत नाही. पण पुढील काळात तलाठ्यांकडून नोंदणी बंद होणार असल्याने शेतकऱ्यांनी गावचे तलाठी कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून ॲपद्वारे नोंदणीचे प्रशिक्षण घ्यावे. ते कसे करायचे याबाबतचा व्हिडिओ पहावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
--