दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन उबवण क्षमता चाचणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:22 AM2021-04-26T04:22:21+5:302021-04-26T04:22:21+5:30
* कृषी अधिकारी किरण पाटील चंदगड : दोन वर्षांत पडलेला मुसळधार पाऊस, सततचे लॉकडाऊन यामुळे सोयाबीन बियाणांचा तुटवडा ...
* कृषी अधिकारी किरण पाटील
चंदगड : दोन वर्षांत पडलेला मुसळधार पाऊस, सततचे लॉकडाऊन यामुळे सोयाबीन बियाणांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे चंदगडमधील शेतकऱ्यांनी आपल्याजवळील सोयाबीन बियाण्यांची उबवण क्षमता तपासून पाहावी म्हणजे दुबार पेरणीचे संकट ओढवणार नाही, असे आवाहन चंदगडचे तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यांनी व्यक्त केले.
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे शेतकऱ्यांशी सोयाबीन बियाण्यांची पेरणी व उगवण क्षमता चाचणी या विषयावर संवाद साधताना ते बोलत होते.
पाटील म्हणाले, सोयाबीनची मळणी, साठवण, हवामान व कालावधी, आदींचा परिणाम सोयाबीनच्या उगवण क्षमतेवर होतो. दुबार पेरणीचे संकट टाळायचे असेल तर शेतकऱ्यांनी उगवण क्षमता चाचणी करणे गरजेचे आहे. यासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार उगवण चाचणी करावी.
सध्या बियाण्यांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाण्यांचा वापर करावा. काही अडचण असल्यास कृषी विभागाच्या कृषी सहायकांशी संपर्क साधावा.
यावेळी कृषी मंडल अधिकारी अक्षय गार्डे, कृषी सहायक आतीष चव्हाण, गोपाळ गव्हाळे यांच्यासह एम. ए. पाटील, पुंडलिक पाटील, एस. के. पाटील, सुबराव गुडाजी, विठ्ठल पाटील, आदी उपस्थित होते.
---------------------
फोटो ओळी : तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता कशी तपासावी याबद्दल मार्गदर्शन करताना कृषी अधिकारी किरण पाटील.
क्रमांक : २५०४२०२१-गड-०८