शेतकऱ्यांना दाम, पोरांना काम पाहिजे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:57 AM2019-04-08T00:57:10+5:302019-04-08T00:57:14+5:30
कोल्हापूर-मलकापूर 55 कि.मी. तानाजी पोवार । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘आवं, निवडणूक सुरू हाय; पण इकडं उमेदवारच नाय ...
कोल्हापूर-मलकापूर
55 कि.मी.
तानाजी पोवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘आवं, निवडणूक सुरू हाय; पण इकडं उमेदवारच नाय तसा प्रचारबी नाय. सारी निवडणूक तिकडंच आणि कुणीबी येईना, आमच्यासाठी कुणी हाय व्हय?... ह्यो पैसंवाल्यांचा ख्योळ. त्यो मोदी येऊ दे, नायतर काँग्रेसवाले; सगळी सारखीच. आमचं शेतात जायचं चुकणार हाय काय?’ अशी प्रतिक्रिया देत एका शेतकऱ्याने भावनांना वाट करून दिली.
‘लोकमत’च्या प्रतिनिधीने बसमधून प्रवास करीत हातकणंगले मतदार-संघातील बांबवडे, शाहूवाडी, मलकापूर मार्गांवरील प्रवाशांच्या भावना जाणल्या. नोकरी मिळत नसल्याने धंदा केला; पण तोही सरकारच्या धोरणामुळे हातबट्ट्यात आल्याची प्रतिक्रिया काहींनी दिली. नव्या सरकारने तरुणांसाठी नोकºया तयार कराव्यात, अशी भावना व्यक्तकेली.
येळाणे-मलकापूर येथील ज्ञानू सुतार म्हणाले, ‘इलेक्शन आली की नेत्यास्नी आमी दिसतोय; नंतर कुणी ढुंकूनबी बघत नाय. शेतकऱ्यांसाठी कुणीबी नाय, एकटा शेट्टी किती भांडणार, त्यो तरी बरं हाय बाबा.’ बांबवडे येथील बाळासाहेब पाटील म्हणाले, शेतकºयांची द्विधा अवस्था झालीय. शेतीमालाला भाव नाही, सरकारला फक्त उद्योजकच पाहिजे, असं दिसतंय. आळतूरचे शिवाजी चौगुले म्हणाले, कॉम्प्युटर-बिम्प्युटर आम्हाला माहीत नाही, शेतातलं पिकलेलं कधी विकणार? हे सरकारनं सांगावं.
वाळू धोरणाचा परिणाम
उचगावचे वाळू व्यावसायिक संपत माने गावठी औषध आणण्यासाठी बांबवडेला जात होते. ते म्हणाले, सरकारच्या वाळू धोरणाने व्यवसायाची वाट लागली, अनेकांनी ट्रक विकले, बांधकाम व्यवसायही कोलमडला.
नोटाबंदी, पेट्रोल-डिझेल दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडले. हाच पैसा उद्योजकांना पुरवला जातोय, तेही पैसे बुडवतात.