नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील रस्ते काम कोल्हापुरात शेतकऱ्यांनी रोखले, तासभर ठिय्या
By संदीप आडनाईक | Published: June 1, 2024 07:18 PM2024-06-01T19:18:01+5:302024-06-01T19:18:32+5:30
महामार्गाच्या वतीने जलवाहिन्या बसवून द्याव्यात
कोल्हापूर : शिये, भुये परिसरातील आठ गावातील महामार्गात येणाऱ्या उपसा सिंचन योजनेच्या जलवाहिन्या नेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याखालून जलवाहिन्या बसवून द्याव्यात या मागणीसाठी शिये येथे तब्बल दीडशे शेतकऱ्यांनी शनिवारी सकाळी भारतीय किसान संघाच्या नेतृत्वाखाली नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील रस्ते काम रोखून धरले. अधिकाऱ्यांनी जलवाहिन्या बसवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
नागपूर-रत्नागिरी महामार्ग हा करवीर तालुक्यातील शिये, भुये, भुयेवाडी, जठारवाडी, निगवे दुमाला, केर्ले, केर्ली, पडवळवाडी या आठ गावातून जातो. हा रस्ता क्रॉस करण्यासाठी येथील शेतकऱ्यांच्या जलवाहिन्या प्रत्येकी अर्धा किलोमीटर अंतरावर महामार्ग प्राधिकरणाकडून ब्लँक टाकण्यात येणार आहेत. याला शेतकर्यांनी आक्षेप घेतला होता. यासंदर्भात राहुल रेखावार जिल्हाधिकारी असताना त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी झालेल्या त्रुटी समजून घेउन हा पाईपलाईन टाकून देण्याचा निर्णयही घेतला होता, मात्र नवीन जिल्हाधिकारी येताच प्राधिकरणाने जुनेच कागदपत्रे दाखवून आपल्या सोयीचा निर्णय घेतला.
त्यामुळे प्राधिकरणाने एका दिवसात हालचाल करुन शेतकरी शेतात असताना या पाईप उखडण्यास सुरुवात केली. या शेतकऱ्यांना ही माहिती समजताच त्यांनी शेतातील कामे सोडून तत्काळ घटनास्थळी धाव घेत रास्ता रोको आंदोलन केले. ज्या ठिकाणी पाईप आहेत, त्याच ठिकाणी महामार्गाच्या वतीने पाईप क्रॉसिंग करुन मिळाव्यात अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे.
दरम्यान, प्रत्येक अर्धा किलोमीटर अंतरावर ब्लँक ठेवल्यास त्यातील त्रुटी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत महामार्ग प्रकल्प संचालक व्ही. डी. पंदरकर यांनाही शेतकऱ्यानी दाखवल्या होत्या. महामार्ग विभागाने शेतकऱ्यांना आहे तिथेच पाईपलाईन बसून द्यावी असे या बैठकीत ठरले होते, पण येथील कंत्राटदार शेतकऱ्यांना पाईपलाईन तुम्ही स्वतःच्या खर्चाने करा असे सांगत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शनिवारी महामार्गावरील कामकाज शेतकऱ्यांनी बंद पाडले.
या आंदोलनात भारतीय किसान संघ जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ शिंदे, करवीर तालुका अध्यक्ष राजेश पाटील, दिलीप नाईक, लक्ष्मण पाटील, अमर पाटील, सर्जेराव निरुखे, अमर निरुखे, कृष्णात पाटील, भीमा खाडे, बाबासो गोसावी, नामदेव शिंदे, विकास पाटील आदी उपस्थित होते.