सरकारच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Published: April 17, 2017 01:06 AM2017-04-17T01:06:35+5:302017-04-17T01:06:35+5:30

बच्चू कडू यांची टीका : पूर्वीच्या आणि आताच्या सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा

Farmers' suicide due to government policy | सरकारच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सरकारच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Next



इचलकरंजी : सन २००६ मध्ये स्वामिनाथन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चाशी निगडित शेतीमालाला बाजारभाव या धोरणाप्रमाणे कॉँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारने धोरण अवलंबले असते तर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
आमदार बच्चू कडू यांच्या नागपूर ते वडनगर या आसूड यात्रेचे आगमन रविवारी येथे झाले. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले, कॉँग्रेसचे सरकार असो किंवा भाजपचे सरकार असो, उत्पादन खर्चापेक्षा कमी हमीभाव शेतीमालाला देण्याच्या धोरणामुळे शेतकरी नुकसानीत जात आहे. पूर्वी आणि आता असलेल्या दोन्हीही सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. मात्र, आम्ही आसूड यात्रेतून शेतकऱ्यांबरोबर कष्टकरी जनतेमध्येही जनजागरण करीत आहोत. शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई लढतो आहोत.
सरकारकडे घोषणाबाजीशिवाय शेतकऱ्यांना देण्यासाठी काहीही नाही. उलट शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. गतवर्षी १३ हजार रुपयांवर असलेल्या तुरीचे भाव यंदा चार ते पाच हजार रुपये इतके कमी झाले. त्यामुळे एकरी ४० हजार रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. एका अर्थाने सरकार व व्यापारीवर्गाने शेतकऱ्यांची केलेली ही लूट आहे. त्याचप्रमाणे शेजारच्या गुजरात राज्यात चार हजार रुपये प्रतिटन उसाला भाव दिला जातो. महाराष्ट्रात मात्र अडीच ते तीन हजार रुपये इतका भाव मिळतो. अशा प्रकारे शेतकऱ्यांची झालेली लूट सरकारने आम्हाला परत दिली पाहिजे. ज्यामुळे राज्यातील शेतकरी आपोआपच कर्जमुक्त होऊन स्वत:च्या पायावर निश्चितपणे उभा राहील. आम्ही शेतकऱ्याच्या परिश्रमाचे, त्याच्या प्रामाणिकपणाचे फळ मागत आहे. म्हणूनच शेतकऱ्याच्या पिकावर उत्पादन खर्चावर किफायतशीर नफा देणारा भाव हवा आहे.
यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील म्हणाले, मोदी सरकारने सबका साथ, सबका विकास म्हणत फक्त मूठभर लोकांचा विकास केला. कॉँग्रेसचे सरकार टाटा, बिर्लाच्या इशाऱ्यावर चालत असे आणि आता मोदींचे सरकार अंबानी-अदानीच्या हातचे बाहुले झाले आहे. पत्रकार परिषदेस आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष सुरेश गडगे, तसेच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, आसूड यात्रेचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
हेमामालिनींकडून शेतकऱ्यांचा अवमान
हेमामालिनी म्हणतात, शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करताहेत. हा अन्नदात्या शेतकरीवर्गाचा अवमान आहे, अशी टीका करून आमदार कडू म्हणाले, हेमामालिनींसह अनेक तथाकथित उच्चभ्रूसुद्धा दारू पितात आणि नाचतात. त्यांच्या कधी आत्महत्या झाल्याचे ऐकिवात आहे का? मग हेमामालिनींकडून शेतकऱ्यांचा अवमान का केला जातो? याचा जाब आम्ही त्यांना विचारणार आहोत.

Web Title: Farmers' suicide due to government policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.