शेतकरी संघाने रेशनचे धान्य जमिनीत गाडले, ग्रामस्थ व अधिकाऱ्यांमध्ये हमरीतुमरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:25 AM2021-07-29T04:25:38+5:302021-07-29T04:25:38+5:30
बाजार भोगाव: पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव येथील शेतकरी संघाने महापुरात भिजलेले धान्य जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने जमिनीत गाडल्याने ग्रामस्थ ...
बाजार भोगाव: पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव येथील शेतकरी संघाने महापुरात भिजलेले धान्य जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने जमिनीत गाडल्याने ग्रामस्थ व अधिकारी यांच्यात ग्रामपंचायत बाजार भोगाव परिसरात जोरात हमरीतुमरी झाली. मात्र, दुकानदाराने ग्रामस्थांची माफी मागितल्यानंतर मंडळ अधिकारी बी.एस. खोत यांनी तीन दिवसांत धान्य देण्याचे आश्वासन दिल्यानंतर अखेर या प्रकरणावर पडदा पडला.
बाजार भोगाव मध्ये शेतकरी संघाचे रेशन दुकान आहे.या संघामध्ये रेशन वाटप केले जाते. मात्र बाजार भोगाव बाजारपेठेत आलेल्या महापुराने अखेर या संघाला गिळकृत केले. त्यामध्ये १६६ पोती गहू, ९६ पोती तांदूळ व ३६ किलोग्रॅम साखरेचे नुकसान झाले. त्यामधील १८ पोती तांदूळ व १५ पोती गहू पूर येण्याच्या अगोदर बाजूला ठेवल्याने बचावले. मात्र हे धान्य १५ जुलै रोजी आले होते. त्यामुळे ते वेळेत वाटप केले असते तर लाभार्थ्यांना मिळाले असते असे म्हणत बाजार भोगाव येथील ग्रामस्थ व महिलांनी बाजार भोगाव ग्रामपंचायतीसमोर दोन तास वाद घातला. मात्र धान्य दुकानदाराने ग्रामस्थांची माफी मागितल्याने प्रकरणावर अखेर पडदा पडला.
चौकट १)
१५ जुलै रोजी धान्य आले होते मात्र शासन नियमाप्रमाणे १९ जुलैला डाटा आल्याने २० जुलैला सर्व्हर डाऊन असल्याने २०/२१ रोजी पोर्ले तर्फे बोरगावला धान्य वाटप केले. अचानक पाणी आल्याने धान्य वाटप करता आले नाही.
सखाराम पाटील
मॅनेजर, शेतकरी संघ शाखा- बाजार भोगाव
चौकट २)
शेतकरी संघाच्या हलगर्जीपणाने गरिबांच्या तोंडचा घास जमिनीत गाडण्याची वेळ आली.
शेतकरी संघातील कामगारांनी प्रसंगावधान ओळखून जर वेळीच हे धान्य उचलले असते तर महापुराच्या विळख्यात हे धान्य सापडले नसते आणि गरिबांच्या तोंडचा घास महापुराने कदापि गिळंकृत केला नसता. अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार व गलिच्छ कारभारावर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
फोटो: पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव येथील शेतकरी संघाने खराब झालेले धान्य जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने जमिनीत गाडले.