शेतकरी संघाच्या चौकशीचे आदेश
By admin | Published: June 19, 2017 05:27 PM2017-06-19T17:27:35+5:302017-06-19T17:27:35+5:30
संचालकांच्या तक्रारीवर जिल्हा उपनिबंधकांची कारवाई
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १९ : शेतकरी संघाच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी सोमवारी काढले. प्रभारी शहर उपनिबंधक टी. बी. बल्लाळ यांना प्राधीकृत केले आहे. संघाच्या कारभाराबाबत तक्रारी दाखल झाल्या होत्या, पण खुद्द चार संचालकांनीच लेखी तकार केल्याने ही चौकशी लावली आहे.
शेतकरी संघाच्या कारभाराबाबत सुरेश देसाई यांच्यासह अनेकांनी तक्रारी केल्या होत्या; पण चार दिवसांपूर्वी वादग्रस्त अधिकारी आप्पासाहेब निर्मळे यांना सचिवपदी नेमणूक करून गैरकारभार सुरू असल्याची तक्रार संघाचे संचालक मानसिंगराव जाधव, शिवाजीराव कदम, श्रीमती शोभना शिंदे-नेसरीकर, श्रीमती विजयादेवी राणे यांनी शनिवारी जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. अध्यक्ष युवराज पाटील, एम. एम. पाटील व जी. डी. पाटील यांनी स्वत:चे आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी अनेकवेळा निलंबित केलेले निर्मळे यांना सचिवपदी नेमणूक केली.
बिद्री शाखेत धनाजी देसाई यांच्याकडून भ्रष्टाचार झाल्याने त्यांना बडतर्फ करण्याचे संचालक मंडळात ठरले होते, पण अध्यक्ष पाटील यांनी त्यांना ‘अभय’ दिले. कणेरी पंपावर काम करणाऱ्या भगवान पाटील यांनी मोठ्या रकमेचे व्यवहार उधारीवर केले आहेत. सध्या त्यांना कार्यालयात कोणतेही काम न देता बसून पगार दिला जातो. दहावी पास असणाऱ्या व भू-विकास बँकेतून सेवानिवृत्त झालेले भीमराव शेलार यांना कायदा विभागाच्या कामकाजासाठी नेमणूक केली आहे, आदी गंभीर तक्रारी करत युवराज पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतील संपूर्ण कारभाराची चौकशी करण्याची मागणी चार संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.तक्रार अर्ज दाखल झाल्यानंतर तत्काळ जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी शहर उपनिबंधक टी. बी. बल्लाळ यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली.
शेतकरी संघाच्या चौकशी करण्यासाठी टी. बी. बल्लाळ यांची नेमणूक केली असून येत्या चार दिवसांत ते चौकशीस सुरुवात करतील.
- अरुण काकडे,
जिल्हा उपनिबंधक