कोल्हापूर: चक्कर येवून ओढ्यात पडल्याने शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू, आजरा तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 05:10 PM2022-09-02T17:10:29+5:302022-09-02T17:12:44+5:30
चक्कर येवून पडल्याने पाण्यात बुडून मुत्यू झाल्यानंतर म्हैस, रेडकू ओढ्याच्या पात्रा ठिकाणी निपचित बाबर यांचेकडे पाहत होते. तर कुत्रा काठावर बसून भुकुंत होता.
भादवण : ओढ्यातील पाण्यात जनावरे धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा चक्कर येवून पडल्याने मृत्यू झाला. तानाजी विठोबा बाबर (वय ५५) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आर्दाळ ता. आजरा येथे ही दुर्दैवी घटना घडली. ओढ्यात पडल्याने डोक्यास व तोंडाला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. शिवाजी विठोबा बाबर यांनी आजरा पोलिसांत याबाबत फिर्याद दिली. गणेशोत्सव सणाच्या काळातच आकस्मिक घटलेल्या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
अधिक माहिती अशी की, तानाजी बाबर हे सकाळच्या सुमारास गावाशेजारील ओढ्याजवळ जनावरे धुण्यासाठी गेले होते. जनावरे धुत असताना त्यांना चक्कर आली असता जनावारांची दोरी त्यांच्या पायाला व हाताला अडकली अन् तोंडावर पाण्यात पडले. तोंडाला जोराचा मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. बाबर यांची विवाहीत मुलगी आल्यानंतर पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह आजरा ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आला. बाबर यांना विवाहीत दोन मुले असून ते नोकरीसाठी बाहेरगावी आहेत.
जनावरे निपचित
बाबर हे रोज जनावारांसोबत कुत्र्याला ही घेऊन जात असत. बाबर यांचा पात्रात बुडून मुत्यू झाल्यानंतर म्हैस, रेडकू ओढ्याच्या पात्रा ठिकाणी निपचित बाबर यांचेकडे पाहत होते. तर कुत्रा काठावर बसून भुकुंत होता.