तुळशी-धामणीतील शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 03:53 PM2020-07-25T15:53:28+5:302020-07-25T16:02:38+5:30
कोरोनाच्या महामारीला सामोरे जात असतानाच शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठे संकट ठाकले आहे. महिनाभरापूर्वी पेरणी केलेली नागली पिके पूर्णपणे वाळून गेली आहेत, तर भात टोकणीचीही अवस्था फार दयनीय झाली आहे. शेकडो हेक्टरवरील नागली ( नाचणा) पिकांबरोबर भातशेती ही फसली असून, परिसरातील शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे.
श्रीकांत ऱ्हायकर
धामोड - कोरोनाच्या महामारीला सामोरे जात असतानाच शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठे संकट ठाकले आहे. महिनाभरापूर्वी पेरणी केलेली नागली पिके पूर्णपणे वाळून गेली आहेत, तर भात टोकणीचीही अवस्था फार दयनीय झाली आहे. शेकडो हेक्टरवरील नागली ( नाचणा) पिकांबरोबर भातशेती ही फसली असून, परिसरातील शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे.
पावसाच्या लहरीपणाने शेतकऱ्यांचे जगणे मेटाकुटीला आले आहे. कोरोनाशी दोन हात करताना विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्याचा प्रयत्न करत पदरमोड करून खरेदी केलेले बियाणे पावसाअभावी शेतातच वाळून गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
उसनवारी करून भात बियाणे खरेदी करून शेतीत टाकली. सुरवातीचा नक्षत्रात तेवढी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला. पण पेरणी नंतर मात्र पावसाने चांगलीच दडी मारली. इंजन, मोटारपंपाच्या सहाय्याने रोप लागण केली. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसापासून एकही पाऊस न लागल्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील लागण केलेल्या रोप लागणी बरोबर भात टोकण व नाचणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सद्यातरी रोप लागण वगळता नाचणी, भात टोकण, मिरची, भुईमूग यासारखी पिके पूर्णतः वाळली आहेत. येत्या नक्षत्रात चांगला पाऊस झालाच तर दुबार पेरणी करूनच शेतकऱ्यांना पिके घ्यावी लागतील. पण तेही पावसाच्या पाण्यावर तो कितपत लागेल हे सांगता येणार नाही. पण शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडला हे नक्की. कृषी विभाग याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार का ? असे प्रश्न विचारला जात आहे .