शेतकरी संघटनेचे लढाउ कार्यकर्ते अजित नरदे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 10:58 AM2020-02-04T10:58:10+5:302020-02-04T11:37:52+5:30
जी. एम. वाण तंत्रज्ञानासाठी आग्रही असलेले आणि अन्नधान्याचे प्रखर पुरस्कर्ते तसेच शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ लढाउ कार्यकर्ते अजित नागेन्द्र नरदे (वय ६८) यांचे मंगळवारी पहाटे येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांचे ते बिनीचे शिलेदार होते.
कोल्हापूर : जी. एम. वाण तंत्रज्ञानासाठी आग्रही असलेले आणि अन्नधान्याचे प्रखर पुरस्कर्ते तसेच शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ लढाउ कार्यकर्ते अजित नागेन्द्र नरदे (वय ६८) यांचे मंगळवारी पहाटे येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांचे ते बिनीचे शिलेदार होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील अजित नरदे हे शेतकरी संघटनेत शरद जोशी यांच्यासोबत १९८0 पासून ते काम करत होते. त्यांचे वडील स्वातंत्रसैनिक होते. शेतकरी संघटनेचा कार्यकर्ताही किती अभ्यासपूर्ण असू शकतो, याचे उदाहरण म्हणून अजित नरदे यांचे नाव घेतले जाई. ते साखर डायरी साप्ताहिकाचे संपादक होते. शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख तसेच तंत्रज्ञान आघाडीचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले होते. त्यांची शेतीविषयक काही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत, अनेक साप्ताहिक-दैनिकांत त्यांनी काम केले होते, तसेच मराठीतील बहुतेक वृत्तपत्रांत शेती अर्थव्यवस्थेवर लेख लिहिले आहेत.
गेल्याच आठवड्यात कोल्हापूर-सांगली रस्त्यावर जयसिंगपूर येथे दुचाकीस्वाराने ठोकरल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर मिरजेच्या रुग्णालयातउपचार सुरु होते, मात्र, सोमवारी त्यांची प्रकृती आणखीन खालावल्याने त्यांना कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र मंगळवारी पहाटे उपचार सुरु असतानाच त्यांचे रुग्णालयातच निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. उदगाव वैकुंठभूमीत त्यांच्यावर अंतिम विधी होणार आहे.