कोल्हापुरात शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला हिंसक वळण; दोन ट्रॅक्टर, चार एकर ऊस पेटवला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 11:22 AM2023-11-10T11:22:57+5:302023-11-10T11:23:13+5:30

कसबा सांगाव : उसाच्या दराची घोषणा करण्याआधी हुपरी (ता. हात-कणंगले) येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे ऊस ...

farmers union movement turned violent in In Kolhapur; Two tractors, four acres of sugarcane were burnt | कोल्हापुरात शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला हिंसक वळण; दोन ट्रॅक्टर, चार एकर ऊस पेटवला

कोल्हापुरात शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला हिंसक वळण; दोन ट्रॅक्टर, चार एकर ऊस पेटवला

कसबा सांगाव : उसाच्या दराची घोषणा करण्याआधी हुपरी (ता. हात-कणंगले) येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे ऊस भरून ट्रॅक्टर जात असताना कारदगा (ता. निपाणी) येथे नरगट्टे वस्तीजवळ संतप्त शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाहने अडवून आग लावली. या आगीत दोन ट्रॅक्टर जळून खाक झाले, तर ट्रॉलीचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच ढोणेवाडीतील एका शेतकऱ्याचा ऊस जवाहर साखर कारखान्यासाठी तोड सुरू होती. त्या उसाच्या फडाला आग लावल्याने मोठे नुकसान झाले आहे.

ही घटना मंगळवार, दि.७ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० वा. घडली. या घटनेची नोंद सदलगा पोलिस ठाण्यात झाली आहे. अज्ञात कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कारखाने ऊस दर निश्चित न करताच कर्नाटक व सीमा भागात ऊस तोडणी करीत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीला हरताळ फासून हुपरीच्या जवाहर प्रशासनाने सीमा भागात ऊसतोड सुरू केली आहे. सर्व वाहने कारदगाहून यळगूड मार्गे रात्री साखर कारखान्याकडे नेली जात असल्याची कुणकुण अज्ञात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना लागली. रात्री १२:३० वाजेच्या सुमारास कारदगा येथील बिरदेव मंदिरच्या मागील बाजूने नेज (ता. चिकोडी) येथून ऊस घेऊन येणारे दोन ट्रॅक्टर ट्रॉली व एक अंगद ट्रॉलीस पन्नास ते साठ अज्ञातांनी ट्रॉलीच्या चाकावर सुलोचन टाकून पेटवून दिले. यावेळी ऊसतोड कामगारांनी तेथून पळ काढला.

दोन्हीही ट्रॅक्टर घटनास्थळी जळून खाक झाले. या वाहनांचे क्रमांक समजू शकले नाहीत, तर तळदंगे येथील प्रमोद भोजकर यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक, एमएच ०९ एफबी ६७९०, तर ट्रॉली क्रमांक केए २३, टीसी ९२८१ अडवून मशीनने तोडलेला ऊस रस्त्यावर टाकला. चारही चाकाना आणि चालक आसनावर आगी लावल्या, यावेळी चालक व कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. चालकाने आग विझविल्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

ढोणेवाडी येथील मनगिणी बारवाडे यांच्या उसास जवाहरची तोडणी सुरू आहे. हा राग मनात धरून अज्ञातांनी उसाच्या फडास आग लावली. या आगीत त्यांचा दोन एकर व शेजारी असलेल्या बाळासो जाधव यांचा दोन एकर ऊस जळून खाक झाल्याने त्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अन्य एका ठिकाणीही ट्रॉली पेटविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी हाणून पाडला आहे.

Web Title: farmers union movement turned violent in In Kolhapur; Two tractors, four acres of sugarcane were burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.