शेतकरी संघाची पोटनियम दुरुस्ती नामंजूर, सभासदांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 03:51 PM2019-09-19T15:51:12+5:302019-09-19T15:53:05+5:30
शेतकरी संघाची निवडणूक लढविण्याबाबत मागील सर्वसाधारण सभेत ठेवलेल्या पोटनियम दुरुस्ती जिल्हा उपनिबंधकांनी नामंजूर केली आहे. या निर्णयामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या सामान्य सभासदांना दिलासा मिळाला आहे.
कोल्हापूर : शेतकरी संघाची निवडणूक लढविण्याबाबत मागील सर्वसाधारण सभेत ठेवलेल्या पोटनियम दुरुस्ती जिल्हा उपनिबंधकांनी नामंजूर केली आहे. या निर्णयामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या सामान्य सभासदांना दिलासा मिळाला आहे.
संघाची निवडणूक लढविणाऱ्या व्यक्ती व संस्था सभासदांना किमान २५ हजारांचे शेअर्स हवेत, त्याचबरोबर व्यक्ती सभासदांना वर्षाला किमान २५ हजारांची, तर संस्था सभासदांना एक लाख रुपये किमतीचा माल संघाकडून खरेदी करावा लागणार, असा पोटनियम दुरुस्ती मागील सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवला होता. त्यावेळी संघाचे माजी कार्यकारी संचालक अजितसिंंह मोहिते यांनी विरोध केला होता. तरीही संचालकांनी पोटनियम मंजूर करून अंतिम मान्यतेसाठी जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविण्यात आला होता.
यापूर्वी शेअर्स रक्कम १00 रुपये होती, त्यात वाढ करून ५00 रुपये केली. संघाची निवडणूक लढविण्यासाठी व्यक्ती सभासदाने वर्षभरात एक हजाराचा, तर संस्था सभासदांनी पाच हजारांचा माल संघाच्या दुकानातून खरेदी करणे आवश्यक होते, त्यात बदल केल्याने सभासदांनी जिल्हा उपनिबंधकांकडे आवाहन दिले होते. जिल्हा उपनिबंधकांनी नामंजूर केल्याने आता पूर्वीप्रमाणेच माल खरेदीची अट राहणार असल्याने सामान्य सभासद निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊ शकतात.