शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:15 AM2021-06-30T04:15:53+5:302021-06-30T04:15:53+5:30
जयसिंगपूर : टाकळी येथे कृष्णा नदीवर कर्नाटक शासनाच्यावतीने कर्नाटकातील चंदूर व महाराष्ट्रातील टाकळी या गावादरम्यान नवीन पुलाचे बांधकाम सुरू ...
जयसिंगपूर : टाकळी येथे कृष्णा नदीवर कर्नाटक शासनाच्यावतीने कर्नाटकातील चंदूर व महाराष्ट्रातील टाकळी या गावादरम्यान नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. या पुलाच्या बांधकामामुळे टाकळीकडील बाजूच्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून दिली जाईल, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
या पुलाच्या बांधकामासाठी संबंधित ठेकेदाराने चंदूर गावच्या बाजूने भराव टाकल्यामुळे पावसाळ्यात नदीपात्रात येणारे पाणी मोठ्या प्रमाणात टाकळीकडील बाजूला असलेल्या शेतामध्ये वेगाने प्रवाहित झाले आहे. यामुळे टाकळीकडील बाजूच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतामधील माती वाहून जाण्याबरोबरच शेतीपंप, विद्युत केबल, तराफा तसेच पाईपलाईन उद्ध्वस्त झाल्या आहेत. एकूणच या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, शेतकऱ्यांच्या या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशा सूचनाही दिल्या असल्याचे मंत्री यड्रावकर यांनी सांगितले.
कोट - या घटनेबाबत कर्नाटक राज्याचे माजी मंत्री प्रकाश हुक्केरी, मंत्री श्रीमंत पाटील व आमदार गणेश हुक्केरी यांच्याशी चर्चा झाली आहे. शुक्रवारी कर्नाटक राज्याच्या लोकप्रतिनिधींसह कर्नाटक व महाराष्ट्र राज्याच्या पाटबंधारे व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत याठिकाणी जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे.
- डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आरोग्य राज्यमंत्री
फोटो - २९०६२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - टाकळी येथे महाराष्ट्र-कर्नाटक दरम्यान होणाऱ्या पुलाची पाहणी डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली.