शेतकऱ्यांचा वीज वितरणशी संघर्ष पेटणार
By admin | Published: September 14, 2016 11:44 PM2016-09-14T23:44:51+5:302016-09-14T23:59:59+5:30
वीज बिल प्रकरण : चार वर्षांची शेतपंपांची थकबाकी पोलिस बंदोबस्तात वसूल करण्याची तयारी
सुहास जाधव--पेठवडगाव -वीज वितरणच्या शेती वीजपंपांची चार वर्षांची थकबाकी तीन कोटी रुपये आहे. ही रक्कम भरण्यासाठी वीज वितरण कंपनीने संबंधित शेतकऱ्यांना थकीत बिल भरण्यासाठी तगादा लावला आहे, तर वीज खंडित करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी पळवून लावले आहे. यामुळे वीज वितरण कंपनीने पोलिसांची मदत घेऊन वसुलीचे नियोजन केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत वीज वितरण कंपनी व शेतकरी आमने-सामने येण्याची चिन्हे आहेत.
जून ते सप्टेंबर हे महिने शेतकऱ्यांच्या आर्थिक मंदीचे दिवस असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दोन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, तसेच शेतकरी संघटनेने वीज थकीत बिलासाठी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यांचा निर्णय होईपर्यंत थकीत बिलांची वसुली जबरदस्तीने करू नये, अशी अपेक्षा आहे. याकडे वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष करून कारवाईचा फास शेतकऱ्यांभोवती आवळला आहे. यामुळे शेतकरी वर्ग द्विधा मन:स्थितीत आहे.
जयसिंगपूर उपविभागामध्ये पाच कार्यालये कार्यरत आहेत. येथील २१,१८३ शेतकऱ्यांची शेतीपंपांची वीज बिले थकीत आहेत. त्यांच्याकडून वीज वितरण कंपनीचे २२ कोटी ९८ लाख ६३ हजार रुपये इतकी थकबाकी आहे. या थकीत बिलांची वसुली करण्यासाठी युद्ध पातळीवर वीज वितरण कंपनीची यंत्रणा सुरू आहे. वसुलीसाठी वीज वितरण कंपनीच्यावतीने विविध पथके तयार करण्यात आली आहेत. वीजपुरवठा खंडित करण्याच्या नोटिसा देऊन वसुली करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. या नोटिसांमध्ये वीज बिलांची रक्कम न भरल्यास १५ दिवसांत विद्युत पुरवठा खंडित करणार असल्याचे नमूद केले आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी आहे.
याबाबत रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने वीज वितरण कंपनीस वीज बिल भरणार नाही, असे पूर्वीच कळविले होते. शेतीसाठी २४ तास पूर्ण दाबाचा विद्युतपुरवठा वीज वितरण कंपनीस बंधनकारक आहे. मात्र, बारा तासांचे भारनियमन, रात्री-अपरात्री वीजपुरवठा करून शेतकऱ्यांचे वीज वितरण कंपनी नुकसान करीत आहे. वीज बिलामध्ये स्थिर, विद्युत, इंधन अधिभार, विद्युत शुल्क, आदी आकार लादून विद्युत ग्राहकांना लुबाडण्याचे काम वीज वितरण कंपनी करीत आहे. थकीत बिलावर सावकारकीसारखी पठाणी व्याज आकारणी करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे, असा वीज वितरण कंपनीच्या नोटिसीला खुलासा देण्यात आला आहे.
इस्लामपूर (ता. वाळवा) येथे वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने तगादा लावला होता. यावेळी विभागीय जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय अधिकारी, वितरण अधिकारी व ग्राहकांची बैठक झाली. यामध्ये विद्युतपुरवठा न तोडता कायदेशीर मार्गाने तोडगा काढावा, अन्यथा जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. असाच निर्णय वडगाव येथेही घ्यावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार शेतीची वीज तोडता येणार नाही, असेही निवेदन वीज वितरण कंपनीस देण्यात आले आहे
तोडग्याची गरज
थकीत वसुलीसाठी शेतकऱ्यांचा कडवा विरोध पाहता वडगाव परिसरातील गावांत झाल्यामुळे वीज वितरण कंपनीने पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधात महावितरण कंपनी, पोलिस यांचा संघर्ष पाहावयास मिळणार आहे. याप्रश्नी दोन्ही बाजूंनी चर्चेतून तोडगा काढण्याची गरज आहे.